March 7, 2026

धान बोनस वितरणात गंभीर विलंब; शेतकरी आंदोलनाच्या उंबरठ्यावर, नितेश मानापुरे यांचे उपमुख्यमंत्र्यांना तातडीचे हस्तक्षेपाचे आवाहन

गडचिरोली,२८ जून २०२५ : गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान (बोनस) वितरणात झालेल्या प्रचंड विलंबामुळे शेतकरी समाजात संतापाची लहर उसळली असून आंदोलनाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. देसाईगंज (वडसा) तालुक्याचे शहर अध्यक्ष नितेश सुधाकर मानापुरे यांनी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून या गंभीर प्रश्नावर तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सरकारने १६ जून २०२५ पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर बोनस रक्कम जमा होईल अशी घोषणा केली होती. परंतु, आज १३ दिवसांनंतरही (२८ जून २०२५ पर्यंत) एकाही शेतकऱ्याच्या खात्यात ही रक्कम पोहोचलेली नाही, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मानापुरे यांनी पत्रात म्हटले आहे की, सध्याच्या हंगामाच्या सुरुवातीला ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरली असती. देसाईगंज वडसा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही हालचाल झालेली नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले असून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. या संदर्भात शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर नाराजी व्यक्त करताना आंदोलनाचा इशारा दिला आहे. मानापुरे यांनी सरकारकडून त्वरित कारवाईची अपेक्षा व्यक्त करताना बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करण्याची मागणी लावून धरली आहे. शेतकरी हितासाठी सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे, अशी त्यांची भूमिका आहे. या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!