पावसाच्या संकटात प्रशासनाचा आधार: गडचिरोलीत बस प्रवाशांचे सुखरूप बचाव
“मुसळधार पावसात अडकलेल्या बसना जिल्हा प्रशासनाचा तात्काळ मदत हात: गडचिरोलीत सर्व प्रवासी सुखरूप”
गडचिरोली, ९ जुलै : मुसळधार पावसामुळे गडचिरोली-नागपूर महामार्गावर काल रात्री दोन ठिकाणी बस अडकून पडल्या होत्या. ठाणेगाव येथे एक खाजगी बस आणि गाढवी नदीजवळील पुलाजवळ एस.टी. महामंडळाची बस सुमारे ३ फूट खोल पाण्यात अडकली होती. या बसमध्ये अनुक्रमे ५० आणि २३ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने त्वरित जेसीबी आणि हायवा पाठवून बचावकार्य सुरू केले.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरीच्या तहसीलदार उषा चौधरी, पोलीस निरीक्षक कैलास गवते, गटविकास अधिकारी मंगेश आरेवार आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने दोन्ही बस सुरक्षित बाहेर काढल्या. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. प्रशासनाने प्रवाशांसाठी ठाणेगाव ग्रामपंचायतीत तात्पुरती निवास आणि जेवणाची व्यवस्था केली.
प्रवाशांनी जिल्हा प्रशासनाच्या तत्पर आणि प्रभावी मदतीबद्दल समाधान व्यक्त करत ‘महाराष्ट्र शासन जिंदाबाद’च्या घोषणा देत प्रशासनाचे आभार मानले.
