September 12, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

अहेरी-भामरागडातील भ्रष्टाचाराविरोधात माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आमरण उपोषण

गडचिरोली, ९ जुलै : अहेरी तालुक्यातील शासकीय योजनांमध्ये गंभीर अनियमितता आणि भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अजय कंकडालवार यांनी ९ जुलै २०२५ पासून गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी ३० जून रोजी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कंकडालवार यांच्या निवेदनानुसार, अहेरी आणि भामरागड तालुक्यांतील अंगणवाडी भरतीपासून ते जलजीवन मिशनपर्यंतच्या योजनांमध्ये भ्रष्टाचाराची खदाण आहे. जलजीवन मिशन अंतर्गत निकृष्ट दर्जाचे पाईप आणि नळजोडणी वापरून लाखो रुपयांची कामे अपूर्ण ठेवली गेली आहेत. काही ठिकाणी एकाच कामाचा अनेक यंत्रणांमार्फत दाखला देत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. भामरागड तालुक्यातील विकासकामांमध्येही त्रुटी आढळल्या असून, अनेक योजनांची कामे केवळ कागदोपत्री दाखवली गेली आहेत. डोंगरातील दगड वापरून औपचारिकता पूर्ण केल्याचा आणि योजनांचे फलक न लावण्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

या सर्व तक्रारींची चौकशी होऊनही संबंधित विभागांनी कारवाई टाळल्याने कंकडालवार यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदनाची प्रत पाठवून ९ जुलैपासून बेमुदत आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

About The Author

error: Content is protected !!