March 7, 2026

चितळ शिकार प्रकरण: अहेरीत पाच जण गजाआड, तपासात आणखी खुलासे अपेक्षित

गडचिरोली, १२ जुलै : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे ९ जुलै २०२५ रोजी रात्री वनविकास मंडळाच्या कॉलनीत चितळाची शिकार करून मांस शिजविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी उपवनसंरक्षक दीपाली तलतले यांच्या पथकाने धाडसत्र राबवून पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेखा दिवाकर वनकर (५५), संजय गोविंदा कोटरंगे (२५), अनिल राजन्ना बोलेम (४०), भानय्या बुचय्या जंगीडवार (६२) आणि अमोल गणपत ठाकरे (३५) यांचा समावेश आहे. यापैकी काही आरोपी हे वनविकास मंडळाचे रोजंदारी मजूर आहेत.

उपवनसंरक्षक दीपाली तलतले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ९ जुलै रोजी रात्री धाड टाकण्यात आली. संजय कोटरंगे याने चितळाचे मांस खरेदी केल्याची कबुली दिली. घटनास्थळी वन्यप्राण्याचे मांस आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार, वनक्षेत्रपाल नारायण इंगळे, गौरव गणवीर, वनपाल सहारे, गोवर्धन, बुद्धावार, तुराणकर आणि वनरक्षक राव व दहागावकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

१० जुलै रोजी पाचही आरोपींना अहेरी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. चितळाच्या मांसाचे वाटप केवळ या पाच जणांमध्येच झाले की अन्य व्यक्तींचाही यात समावेश आहे, हे तपासातून स्पष्ट होईल. तसेच, या शिकारीमागे कोणाचा आशीर्वाद होता, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

उपवनसंरक्षक दीपाली तलमले यांनी सांगितले की, माहिती मिळताच तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार वन्य प्राण्यांची शिकार करणे, मांस खरेदी-विक्री करणे किंवा त्यांचे अवयव बाळगणे हा कायदेशीर गुन्हा आहे. कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाने वन्यजीव संरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला असून, यापुढेही अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाने म्हटले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!