March 7, 2026

ग्रामसभेचा अल्टिमेटम: सुनावणी निकालावर रास्ता रोकोचा निर्णय

“घाटी ग्रामसभेचा निर्णय: रास्ता रोको आंदोलन तात्पुरता स्थगित, आमरण उपोषण सुरूच”

कुरखेडा, गडचिरोली (12 जुलै 2025): घाटी ग्रामसभा, तालुका कुरखेडा, जिल्हा गडचिरोली यांनी दिनांक 11 जुलै 2025 रोजी हनुमान मंदिर प्रांगणात झालेल्या सभेत महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केले. यामध्ये दिनांक 14 जुलै 2025 रोजी नियोजित रास्ता रोको आंदोलन आणि शाळा तसेच शासकीय कार्यालय बंदचा निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. हा निर्णय आमदार रामदासजी मसराम, पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ, आणि प्रभारी तहसीलदार तथा नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांच्या 11 जुलै रोजी झालेल्या भेटीतील चर्चेनंतर घेण्यात आला.

अधिकाऱ्यांनी ग्रामसभेला 15 जुलै 2025 रोजी उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांच्याकडील सुनावणीस उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यानुसार, ग्रामसभेचे शिष्टमंडळ सुनावणीस हजर राहणार आहे. मात्र, सुनावणीत ग्रामसभेच्या बाजूने निर्णय न झाल्यास किंवा रेतीचे ट्रॅक्टर सोडले गेले नाहीत, तर 16 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता घाटी बसस्थानक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन पुन्हा सुरू होईल, असा इशारा ग्रामसभेने दिला आहे.

दरम्यान, 7 जुलै 2025 पासून सुरू असलेले आमरण उपोषण ग्रामसभेचे समाधान होईपर्यंत सुरू राहील, असा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. ग्रामसभेच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांमधील तणाव निवळण्याची शक्यता आहे, परंतु सुनावणीचा निकाल आंदोलनाच्या पुढील दिशेला ठरवणार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!