September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गडचिरोलीत शिक्षक टंचाईचे संकट: शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता धोक्यात

“गडचिरोलीत शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर: शाळांमधील शैक्षणिक नुकसान वाढले”

गडचिरोली, २० जुलै : जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शैक्षणिक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. कमी पटसंख्या (10 पेक्षा कमी) असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक कार्यरत असताना, 30 पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये केवळ एकच शिक्षक नियुक्त आहे. ही विसंगती शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम करत आहे.

जिल्ह्यात शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया फेब्रुवारीपासून सुरू असली तरी ती पूर्ण झालेली नाही. 19 जुलै रोजी पहिल्या टप्प्यातील बदल्यांची यादी प्रसिद्ध झाली, मात्र संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी दोन महिने लागण्याची शक्यता आहे. पंचायत समिती स्तरावर गट शिक्षणाधिकाऱ्यांना तात्पुरत्या प्रतिनियुक्तीचे अधिकार देण्यात आले असले, तरी ही प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही. परिणामी, शाळा सुरू होऊन 25 दिवस उलटले तरी अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम आहे.

काही शाळांमध्ये कंत्राटी शिक्षकांमार्फत काम चालवले जात आहे, परंतु नियमित शिक्षकांशिवाय शाळेची जबाबदारी पूर्णपणे सांभाळणे कठीण आहे. शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने रिक्त पदांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे मोठ्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाबासाहेब पवार यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्याचा आढावा घेऊन पटसंख्येनुसार शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत कंत्राटी शिक्षकांवर अवलंबून राहावे लागत आहे. शिक्षण विभागाने तातडीने उपाययोजना करून रिक्त पदे भरण्याची गरज आहे, अन्यथा शैक्षणिक गुणवत्तेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची भीती आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!