मनमानी बिल, खोटे आरोप: आजाद समाज पार्टीने घेतला महावितरणचा समाचार
“आजाद समाज पार्टीचा महावितरणवर हल्लाबोल: मनमानी बिल आणि चोरीच्या खोट्या आरोपांविरोधात आंदोलन”
आरमोरी, २० जुलै : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात आजाद समाज पार्टीने आरमोरी तालुक्यातील महावितरण कार्यालयास घेराव घालत तीव्र आंदोलन केले. पक्षाचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम आणि जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांच्या नेतृत्वात, विधानसभा अध्यक्ष ऋषी सहारे यांच्या पुढाकाराने हे आंदोलन झाले.
महावितरणने तालुक्यातील अनेक गावांमध्ये ग्राहकांच्या परवानगीशिवाय, शासकीय आदेश किंवा तक्रारीशिवाय विज मीटर जबरदस्तीने बदलले. यामुळे ग्राहकांचे बिल ₹500 वरून ₹3000 पर्यंत वाढले. तसेच, सहा महिन्यांपासून मीटर बिघाडाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून मनमानी बिल आकारले जात आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, नियमित बिल भरणाऱ्या 75-80 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांवर चोरीचे खोटे आरोप ठेवून ₹56,000 चा दंड लादला गेला. याला पक्षाने “सामान्य नागरिकांची लूट” संबोधले.
आंदोलनादरम्यान, पक्षाने अभियंता बागुलकर यांना जाब विचारला, परंतु त्यांनी कोणतेही आदेश किंवा मार्गदर्शक तत्त्वे दाखवली नाहीत. कर्मचारी सूरज देशमुख यांच्या अरेरावी वर्तनाबद्दल तात्काळ निलंबनाची मागणीही करण्यात आली. महावितरणने “ही बाब आमच्या हातात नाही, जिल्हा कार्यालयाच्या अधीन आहे” असे सांगत टाळाटाळ केली.
आजाद समाज पार्टीने येत्या काळात मुख्य अभियंत्यांना घेराव घालण्याचा आणि महावितरणच्या बोगस कारभाराविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. आंदोलनात प्रवक्ते प्रितेश अंबादे, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, सतीश दुर्गमवार, धनराज दामले, लकी पाटील, भारत मेश्राम, विनोद दुमाने, टारझन निमगडे आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
