काटली येथे अज्ञात वाहनाने सहा मुलांना चिरडले: चार ठार, दोन गंभीर जखमी, गावकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन
गडचिरोली, ७ ऑगस्ट : गडचिरोली – आरमोरी मुख्य मार्गावरील काटली येथील नाल्याजवळ आज सकाळी ५:३० वाजता एका अज्ञात वाहनाने व्यायाम करणाऱ्या सहा मुलांना चिरडल्याची हृदयद्रावक घटना घडली. या भीषण अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला, तर दोन मुले गंभीर जखमी झाली आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संतप्त गावकऱ्यांनी काटली बस थांब्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.
मृतांमध्ये पिंकू नामदेव भोयर (वय १४), तन्मय बालाजी मानकर (वय १६), दिशांत दुर्योधन मेश्राम (वय १४) आणि तुषार राजेंद्र मारभते (वय १४), सर्व रा. काटली, यांचा समावेश आहे. पिंकू आणि तन्मय यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिशांत आणि तुषार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. क्षितीज तुळशिदास मेश्राम (वय १४) आणि आदित्य धनंजय कोहपरे (वय १४) हे गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य आणि तपास सुरू केला. दरम्यान, संतप्त गावकऱ्यांनी अज्ञात वाहनाचा त्वरित शोध घेऊन चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. “जोपर्यंत आरोपी सापडत नाही आणि कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींना तात्काळ नागपूर येथे हलवण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या अपघाताने काटली गावात शोककळा पसरली असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत. या घटनेने रस्ते सुरक्षा आणि वाहनचालकांच्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
