अंगदान अभियान: नव्या जीवनाची पहाट
“अवयव दान: जीवनाला नवी संजीवनी देणारी चळवळ”
माणुसकीच्या सर्वोच्च मूल्यांचा सन्मान करणारी एक क्रांतिकारी चळवळ म्हणजे अवयव दान! महाराष्ट्र शासनाने यंदा “अंगदान – जीवन संजीवनी अभियान” अंतर्गत ३ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत अवयव दान पंधरवडा राबवण्याचा संकल्प केला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश आहे समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत अवयव दानाचे महत्त्व पोहोचवणे, यासंबंधीच्या गैरसमजांना दूर करणे आणि मानवतावादी दृष्टिकोन रुजवून गरजूंना नवजीवन देणे. ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून, एका व्यक्तीच्या परोपकारी कृत्याने अनेकांचे आयुष्य बदलण्याची ताकद आहे.
अवयव दान: माणुसकीचा सन्मान
एका ब्रेन डेड व्यक्तीच्या अवयव दानामुळे तब्बल सात रुग्णांना नवे जीवन मिळू शकते. यकृत, मूत्रपिंड, हृदय, फुफ्फुसे, स्वादुपिंड आणि डोळ्यांचे दान करून अनेकांचे आयुष्य पुन्हा बहरू शकते. तरीही, समाजात अवयव दानाबाबत अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. काहींना वाटते की, अवयव दानामुळे मृत्यूनंतर शरीर अपूर्ण राहील किंवा धार्मिक दृष्टिकोनातून हे चुकीचे आहे. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे आहे. अवयव दान धार्मिक आणि सामाजिक मूल्यांशी सुसंगत आहे आणि हा एक परोपकारी कृत्य आहे, जो माणुसकीचा सन्मान वाढवतो.
महाराष्ट्र शासनाचे पुढाकार
महाराष्ट्र शासनाने या अभियानाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचा प्रयत्न केला आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वतः अवयव दानाची शपथ घेऊन या चळवळीला सुरुवात केली. त्यांनी म्हटले, “अवयव दान हे केवळ दान नाही, तर एका व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा परोपकारी कृत्य आहे.” या अभियानांतर्गत राबवले जाणारे उपक्रम प्रभावी आणि सर्वसमावेशक आहेत:
– जनजागृती कार्यक्रम : शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने रॅली, नाट्यप्रदर्शन आणि प्रबोधन सत्रांचे आयोजन.
– वैद्यकीय समन्वय : रोट्टो, सोट्टो आणि झेडटीसीसी (मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) यांच्या समन्वयाने कार्यशाळा आणि चर्चासत्रे.
– सन्मान सोहळा: १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात अवयव दात्यांच्या कुटुंबांचा विशेष सन्मान.
– वैद्यकीय शिक्षण: वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये जनजागृती आणि प्रत्यारोपण सुविधांचा विस्तार.
आव्हान आणि उपाय
महाराष्ट्रात दरवर्षी हजारो रुग्ण यकृत, मूत्रपिंड आणि हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असतात. परंतु, अवयव दानाचे प्रमाण अत्यल्प आहे. याचे मुख्य कारण आहे जनजागृतीचा अभाव आणि गैरसमज. या अभियानाद्वारे शासन या आव्हानांना सामोरे जात आहे. धुळे, अकोला, ठाणे यांसारख्या जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर रॅली, नाट्यप्रदर्शन आणि स्थानिक नेत्यांच्या सहभागाने जनजागृती केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागात ग्रामपंचायती आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने माहिती पोहोचवली जात आहे.
तुम्ही कसे सहभागी होऊ शकता?
अवयव दानाची शपथ घेणे सोपे आहे. राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या (NOTTO) संकेतस्थळावर (https://notto.gov.in/) तुम्ही तुमची इच्छा नोंदवू शकता. यासाठी वैद्यकीय तपासणीची गरज नाही; फक्त तुमची इच्छा आणि कुटुंबाची संमती पुरेशी आहे. शपथ घेतल्यानंतर तुम्हाला अवयव दान कार्ड मिळते, जे तुमच्या या उदात्त इच्छेचे प्रतीक आहे.
“जीवन दान, माणुसकीचा सन्मान”
हे अभियान केवळ अवयव दानाचे प्रमाण वाढवण्यापुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक एकता आणि परोपकाराचा संदेश देते. अवयव दानामुळे केवळ रुग्णांचे आयुष्य वाचत नाही, तर दात्याच्या कुटुंबाला आणि समाजाला एका उदात्त कार्याचा अभिमान मिळतो. एक छोटीशी शपथ अनेकांना नवजीवन देऊ शकते.
महाराष्ट्र शासन सर्व नागरिकांना आवाहन करते की, या अभियानात सहभागी व्हा, अवयव दानाची शपथ घ्या आणि इतरांना प्रेरित करा. चला, या पंधरवड्यात आपण सर्वजण मिळून अवयव दानाच्या चळवळीला गती देऊया आणि महाराष्ट्राला या क्षेत्रात देशात अग्रेसर बनवूया. अवयव दान – एका जीवनाचा अंत, दुसऱ्या जीवनाचा प्रारंभ!
लेखक: चेतन गंगाधर गहाणे
मो. 9168436285
मु. कुंभीटोला, ता+पो कुरखेडा, गडचिरोली
