खनिज संपत्तीतून समृद्धी: गडचिरोलीसाठी १५० कोटींचा विकास आराखडा
गडचिरोली, १२ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील खनिज उत्खननामुळे प्रभावित ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत १५० कोटी रुपयांचे व्यापक विकास नियोजन जाहीर करण्यात आले आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत, खनिज प्रभावित क्षेत्रात (प्रत्यक्ष: १५ किमी, अप्रत्यक्ष: १५-२५ किमी) आरोग्य, शिक्षण, कृषी, रोजगार, पर्यावरण आणि पायाभूत सुविधांसाठी निधीचा वापर होणार आहे.
आरोग्य सुविधांचा विस्तार
आरोग्य सेवांमध्ये सुधारणेसाठी उपकेंद्रांवर प्रसूतीगृहे, मोबाईल रक्त संकलन व एक्स-रे युनिट, अतिरिक्त रुग्णवाहिका उपलब्ध होणार आहेत. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाचे सक्षमीकरण आणि ३३ उपकेंद्रे व ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रे बसवली जाणार आहेत.
कृषी आणि सिंचन विकास
कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा पंप, मका-कापूस औजार बँक, सौर कुंपण आणि सिंचन सुविधांसारखे प्रकल्प राबवले जाणार आहेत, ज्यामुळे शेती उत्पादकता वाढेल.
शिक्षण आणि कौशल्य विकास
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्मार्ट शाळा आणि डिजिटल वर्गखोल्या उभारल्या जाणार आहेत. उपजीविकेसाठी कुक्कुटपालन, महिलांसाठी ई-कार्ट, पोहा-टोरी प्रक्रिया केंद्र आणि एटापल्ली येथे कौशल्य प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार आहे.
नगर विकास आणि पर्यावरण संवर्धन
नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी कचरा संकलन वाहने, एटापल्ली तलावाचे सौंदर्यीकरण, सौर लाईट, वृक्षलागवड आणि मृदा-जलसंधारणाची कामे हाती घेतली जाणार आहेत.
पायाभूत सुविधा आणि दीर्घकालीन नियोजन
महत्त्वपूर्ण रस्त्यांचे मजबुतीकरण आणि पायाभूत सुविधांसाठी प्रकल्प राबवले जातील. दीर्घकालीन विकासासाठी पंचवार्षिक आणि वार्षिक योजना तयार होत असून, त्या राष्ट्रीय संकेतस्थळावर अपलोड केल्या जाणार आहेत.
जिल्हा प्रशासनाने प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, नियमित पुनरावलोकन आणि मूल्यांकनाद्वारे पारदर्शकता सुनिश्चित होईल. “या योजनांमुळे खनिज प्रभावित भागात सामाजिक व आर्थिक बदल घडतील,” असे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी सांगितले.
