महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आता गडचिरोलीच्या मातीत..!
1 min readमुलचेरा तालुक्यातील 17 शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग, 350 पर्यंत मिळतोय दर.
- प्रतिनिधी : आनंद दहागावकर, अहेरी
कष्टकरी कासत्कारानी जिद्द ठेवली, जोखीम स्वीकारली आणि कष्ट केले तर विपरीत परिस्थितीत सुद्धा यश हाती येते.
हेच सूत्र वापरून मुलचेरासारख्या दुष्काळ आणि दुष्काळ आणि उष्ण हवामानातही स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. स्ट्रॉबरीसाठी साधारणपणे थंड हवामान लागते. गडचिरोलीसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही स्ट्रॉबरीसारखे पीक घेता येते, हे आता सिद्ध झाले आहे. मुलचेरा तालुक्यातील जवळपास 15 ते 20 शेतकऱ्यांनी ही किमया करून दाखविली आहे.
मुलचेरा तालुक्यात सन 2020-21 मध्ये नंदनवन शेती संकल्पनेतून विवेकानंदपूर मुलचेरा, कोपरअली, विश्वनाथनगर आणि कोळसापूर या पाच गावांत किमान 100 हेक्टर क्षेत्र केंद्रित करून नंदनवन शेती संकल्पना राबविण्यात आली होती. पूर्वी ‘पिकेल ते विकेल’ या पद्धतीने शेती होत होती परंतु, ‘विकेल ते पिकेल’ यावर लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणात मागणी असणारे स्ट्रॉबेरीसारखे पीक प्रायोगिक तत्त्वावर घेण्यात आले होते. यात कृषी विभागाला यश आले.
पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात स्ट्रॉबेरीचा यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे मोठ्या प्रमाणात तर चिखलदरा येथे थोड्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली जाते. या पिकाकरिता थंड हवामानाची गरज असते. याउलट पूर्व विदर्भातील चंद्रपूर याठिकाणी उन्हाळ्यात सर्वाधिक तापमानाची नोंद होते.
याच चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेपासून केवळ 25 ते 30 किमी अंतरावर मुलचेरा तालुका येतो. हवामानाची कसोटी असतानाही पहिल्या वर्षात चार शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर प्रत्येकी 400 रोपे याप्रमाणे एकूण 1600 रोपांची लागवड करण्यात आली होती.
यात आपल्याही भागात स्ट्रॉबेरी पीक घेता येते हे सिद्ध होताच, यावर्षी जवळपास 17 शेतकऱ्यांनी मल्चिंग पद्धतीने स्ट्रॉबेरीची लागवड केली. विशेष म्हणजे, आता स्ट्रॉबेरी पीक काढणीचा हंगाम सुरू असून जवळपास 300 रुपये दराने विकली जात आहे.
यापूर्वी मी आपल्या शेतात धान व मका ही दोन पीक घेत होतो. मात्र, कृषी विभागातर्फे स्ट्रॉबेरीची माहिती मिळतात यंदा पहिल्यांदाच स्ट्रॉबेरीची लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळाले आहे. भविष्यात कृषी विभागाने साथ दिल्यास मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येईल. – अरविंद तोरे, स्ट्राबेरी उत्पादक शेतकरी, बंदूकपल्ली
उक्त स्ट्रॉबेरी हे नाविन्यपूर्ण पीक म्हणून मुलचेरा तालुक्यात लागवड सुरू केली आहे. स्ट्रॉबेरी पीक हे केवळ महाबळेश्वरपुरते मर्यादित न राहता याचा प्रयोग आपल्या जिल्ह्यात करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी संजय मीना आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 17 शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी केले आहे.
याचा यशस्वी प्रयोग दोन वर्षांपूर्वीच मुलचेरा तालुक्यात करण्यात आली होता. स्ट्रॉबेरीचे पीक हे थंड हवेच्या ठिकाणी घेतले जाते. परंतु, विदर्भाचे तापमान बघता या तापमानातही हे पीक घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
स्ट्रॉबेरी पीक हे पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. स्ट्रॉबेरीला जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपये दर मिळत आहे अशी माहिती येथील तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.