डिप्राटोला परिसरात गळा चिरून प्रेयसीची हत्या करणाऱ्या त्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
1 min readअपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एम. मुधोळकर यांचा निर्णय.
गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी केला होता.
गडचिरोली, 05 फेब्रुवारी :- प्रेयसीचा गळा दाबून व तिचा अर्धवट गळा कापून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ४ फेब्रुवारी रोजी गडचिरोलीचे अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू.एम. मुधोळकर यांनी सुनावली. प्रदीप बालसिंग हारामी रा. ढोलडोंगरी (हल्ली मुक्काम अंतरगाव) ता. कोरची असे आरोपीचे नाव आहे.
मृतक प्रेयसी ही पुणे येथे नोकरी करीत होती. गावात मंडई असल्याने ती पुणे येथून आपल्या गावकडे येत असताना आरोपी प्रियकराने तिला ३१ जानेवारी २०१८ रोजी देसाईगंज येथून सोबत आणले. दरम्यान, डिप्राटोला ते तळेगावला जाणाऱ्या कच्चा रोडच्या बाजूला घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला. यावेळी प्रेयसीने त्याला लग्नाची गळ घातली. मात्र, आरोपी प्रियकराचे दुसऱ्या महाविद्यालयीन मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध असल्याने त्याने तिचा गळा दाबून व त्यानंतर तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जिवानिशी ठार केले.
दरम्यान, २ फेब्रुवारी २०१८ रोजी कुरखेडा पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सहारे नेहमीप्रमाणे कर्तव्यावर असताना त्यांना डिप्राटोला ते तळेगाव कच्चा रोडच्या बाजूला एका महिलेचा मृतदेह पडून असल्याची माहिती मिळाली. त्यांनी चौकशी केली असता १८ ते २० वर्षे वयोगटातील मुलीचा मृतदेह मिळून आला. तिच्या मृतदेहाजवळ ट्रॅव्हल्सची तिकिट व त्या तिकिटावर मोबाइल क्रमांक मिळून आल्याने अधिक चौकशी केली असता आरोपी प्रदीप हारामी याचा मोबाइल क्रमांक असल्याचे निष्पन्न झाले.
३ फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपीला अटक करून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. पोलीस यंत्रणेने कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व इतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून व प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेऊन ४ फेब्रुवारी २०२३ रोजी आरोपी प्रदीप बालसिंग हारामी याला अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एम. मुधोळकर यांनी जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली व कलम ३७६ अन्वये निर्दोष मुक्तता करण्यात आली.
सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अनिल प्रधान यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पडळकर यांनी केला. प्रकरण निर्गतीकरिता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य भूमिका पार पाडली.