March 7, 2026

कुरखेड्यात दूषित पाण्याचा प्रश्न गंभीर: शिवसेना (शिंदे गट) ने नगर पंचायत प्रशासनाला घेरले, आमदार मसराम यांचे शुद्ध पाण्याचे निर्देश

कुरखेडा, 29 ऑगस्ट : कुरखेडा नगर पंचायतकडून पुरवठा होणाऱ्या दूषित पाण्याच्या समस्येने येथील नागरिक हैराण झाले असताना, शिवसेना (शिंदे गट) ने या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेत नगर पंचायत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शिवसेनेचे संघटनमंत्री ईश्वर ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे यांनी आमदार रामदास मसराम यांच्या जनता दरबारात दूषित पाण्याने भरलेली बाटली ठेवत हा गंभीर मुद्दा उपस्थित केला. यावेळी उपस्थित नगर पंचायतचे अभियंता जनबंधू यांना सदर पाणी पिऊन दाखवण्याचे थेट आव्हान देण्यात आले, ज्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा समोर आली.

शिवसेना तालुका वैद्यकीय प्रमुख शहेजाद हाशमी यांनी यावेळी सविस्तर माहिती देताना सांगितले की, कुरखेडा मुख्यालयातील दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. अनेक कुटुंबांना पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या नगर पंचायतला पाणीपट्टी आकारण्याचा नैतिक अधिकारच काय आहे? यासंदर्भात त्यांनी जोपर्यंत शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नाही, तोपर्यंत पाणीपट्टी आकारू नये, अशी मागणी लावून धरली.

आमदार रामदास मसराम यांनी या समस्येवर गंभीर चिंता व्यक्त करत नगर पंचायतच्या उदासीन वृत्तीवर नाराजी दर्शवली. त्यांनी प्रशासनाला तातडीने शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यावेळी अभियंता जनबंधू यांनी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होईपर्यंत ही समस्या पूर्णपणे सुटणार नसल्याचे सांगितले. त्यांनी पुढे नमूद केले की, या प्रकल्पासाठी प्रशासनिक स्तरावरून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, ईश्वर ठाकूर यांनी या निव्वळ वेळकाढूपणावर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, लोकांच्या आरोग्याशी निगडित असा गंभीर विषय असताना प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत आहे का?

विशेष बाब म्हणजे, कुरखेडा नगर पंचायतवर गेल्या दोन टर्मपासून सत्ता असलेले चंदेल यांचा पक्ष आणि त्यांचे राजकीय समीकरण या प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. नुकतेच शिवसेना (उबाठा गट) सोडून शिवसेना (शिंदे गट) मध्ये सामील झालेले चंदेल यांच्या नेतृत्वाखालील नगर पंचायतीला यापूर्वीच विकासकामांबाबत टीकेचा सामना करावा लागला आहे. नगर पंचायत स्थापनेसाठी मिळालेल्या 3 कोटी रुपयांच्या निधीपैकी 1 कोटी रुपये खर्चून केवळ खंडहर बांधण्याची “उपलब्धी” त्यांच्या नावावर जमा आहे. आता त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी शुद्ध पाण्यासारख्या मूलभूत सुविधेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्याने येथील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे कुरखेड्यातील नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली आहे. शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी स्थानिक प्रशासन कधी ठोस पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या काळात या प्रश्नावरून कोणती राजकीय समीकरणे घडतात आणि नगर पंचायत प्रशासन नागरिकांना शुद्ध पाणी कधी उपलब्ध करून देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!