“चिचटोला फाट्यावर यात्री निवारा, श्मशानभूमी आणि विसावा उभारण्याची मागणी; आमदारांना सादर केले निवेदन”
कुरखेडा, गडचिरोली (ऑगस्ट २८ ): चिखली ग्रामपंचायत अंतर्गत कुरखेडा-वडसा मुख्य मार्गावरील चिचटोला फाटा येथे यात्री निवारा, श्मशानभूमी आणि विसावा उभारण्याची मागणी करणारे निवेदन आज माननीय आमदार श्री. रामदास मसराम यांना कुरखेडा येथील जनता दरबारात सादर करण्यात आले. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य रामसाय मडावी, आम आदमी पार्टीचे संघटक अतुल सिंदराम, महेंद्र मडावी, सतीश सिंदराम, रोशन नैताम आणि विजय मडावी यांच्या सह्या आहेत.
चिचटोला फाटा हा गजबजलेला परिसर असून, येथे यात्री निवारा नसल्याने प्रवाशांना, विशेषतः महिला, वृद्ध आणि लहान मुलांना तीव्र ऊन, पाऊस आणि थंडीमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागल्याने अपघातांचा धोका वाढतो, तर पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि आसन व्यवस्थेचा अभाव यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. तसेच, श्मशानभूमी आणि विसाव्याच्या अभावामुळे स्थानिकांना अंत्यसंस्कार आणि विश्रांतीसाठी योग्य जागेची कमतरता भासते.
निवेदनात यात्री निवाऱ्यासाठी मजबूत छत, पुरेशी आसन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, रात्रीसाठी प्रकाश आणि सुरक्षित स्थळाची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, श्मशानभूमी आणि विसावा उभारण्याची विनंतीही करण्यात आली आहे. या सुविधांमुळे स्थानिकांचे जीवनमान सुधारेल आणि प्रवास सुरक्षित होईल, असे निवेदनात नमूद आहे.
या प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष नसिर हाशमी आणि युवा संघटक अतुल सिंदराम उपस्थित होते. स्थानिक ग्रामपंचायत आणि नागरिकांनी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. आमदार रामदास मसराम यांनी या मागणीवर सकारात्मक कार्यवाहीचे संकेत दिले असून, लवकरच याबाबत पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.
