March 7, 2026

गडचिरोलीत पर्यटन महोत्सव: २३ ते २७ सप्टेंबर पर्यंत विविध उपक्रम

गडचिरोली, २१ सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी २३ ते २७ सप्टेंबर दरम्यान ‘पर्यटन परिवर्तन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना प्रचारित करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे. काल झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी सर्वांना जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडण्याचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, उपवनसंरक्षक आर्या, आदिवासी प्रकल्प अधिकारी व सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव, प्रकुलगुरू श्रीराम कावळे, उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, पंकज नंदगिरीवार व सहायक प्राध्यापक प्रितेश जाधव उपस्थित होते. महोत्सवासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, गोंडवाना विद्यापीठ, वन विभाग, भारतीय पुरातत्त्व विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा माहिती कार्यालय, स्वच्छ भारत मिशन, नेहरू युवा केंद्र/एनएसएस, उमेद-माविम-खादी ग्रामोद्योग, शिक्षण व पंचायत विभागांना विशेष जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. स्वच्छता अभियान, कमी ओळखलेली पर्यटन स्थळांची प्रसिद्धी, सुविधा तपासणी व डिजिटल प्रचारावर भर देण्यात आला आहे.

पाच दिवसांच्या महोत्सवात विविध उपक्रमांचे आयोजन आहे. २३ सप्टेंबरला निबंध लेखन, बातमी लेखन व वादविवाद स्पर्धा; २४ सप्टेंबरला शाळांद्वारे पर्यटन जागरुकता मोहीम, वैद्यांचे औषधी वनस्पती प्रात्यक्षिक व पॅनेल चर्चा; २५ सप्टेंबरला वारसा फेरी, स्वच्छता अभियान, लोककथा कथन व पारंपरिक खेळ; २६ सप्टेंबरला आदिवासी उत्पादने व पर्यटन बाजारपेठ कार्यशाळा, आदिवासी फॅशन शो व नृत्य कार्यक्रम; तर २७ सप्टेंबरला समारोप सोहळा व ‘परिवर्तन उद्घोष’ कार्यक्रम होईल. यावेळी सांस्कृतिक, जंगल, आरोग्य, जल, अध्यात्मिक व परिवर्तनशील अशी सहा पर्यटन गावे जाहीर करून उत्कृष्ट गाव, विभाग व युवकांचा सत्कार केला जाईल.

स्पर्धांमध्ये विजेत्यांना ५,००१, ३,००१ व १,००१ रुपयांची पारितोषिके व मानपत्रे दिली जातील. निवडक लेख व संशोधन प्रकाशनासाठी शैक्षणिक नियतकालिकांत संधी उपलब्ध असेल. सहभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा परिवर्तन समिती कक्ष (९४२२६३४००२) किंवा नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे यांच्याशी संपर्क साधावा.

महोत्सवाचा सोशल मीडिया प्रचार #GadchiroliTourismFestival, #GadchiroliTourism व #पर्यटनपरिवर्तनमहोत्सव२०२५ हॅशटॅगने केला जाईल. स्थानिक युवक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहभागाने जिल्ह्यातील पर्यटनात नवे परिवर्तन घडेल, असा विश्वास जिल्हाधिकारी पंडा यांनी व्यक्त केला. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!