September 16, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गोठणगावच्या ग्रामपंचायतीच्या कारभारावर वामन पाटणकरांचा सवाल; ‘सोशल ऑडिट’ची मागणी

“२०२२-२३ पासूनच्या जमा-खर्चाचा निष्पक्ष हिशेब ग्रामसभेसमोर मांडा; कथित १ कोटी १ लाखांच्या आर्थिक अनियमिततेची चौकशी करण्याची मागणी”

कुरखेडा | दि. १५ सप्टेंबर २०२६

गोठणगाव ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीतील संपूर्ण जमा-खर्चाचे सामाजिक अंकेक्षण (Social Audit) करून त्याचा अहवाल ग्रामसभेसमोर सादर करावा, अशी मागणी गोठणगाव येथील ग्रामसभा सदस्य वामन पाटणकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंचायत समिती कुरखेड्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

गोठणगाव ग्रामपंचायतीच्या सन २०२२-२३ पासून २०२५-२६ पर्यंतच्या जमा-खर्चाबाबत आर्थिक अनियमितता अथवा अफरातफर झाल्याची माहिती विविध प्रसारमाध्यमांतून निदर्शनास आल्याचे पाटणकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच तत्कालीन सहाय्यक गटविकास अधिकारी डी. बी. उराडे यांनी प्रसारमाध्यमांसह ग्रामपंचायतीस नोटीस देऊन सुमारे रु. १,०१,७१,६९८.५३ इतक्या रकमेच्या आर्थिक अनियमिततेबाबत स्पष्ट केले असल्याचा उल्लेख निवेदनात आहे.

वामन पाटणकरांचा थेट सवाल — ‘जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेसमोर का नाही?’

ग्रामपंचायतीकडे येणारा निधी हा कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचा नसून शासनाचा आणि सर्वसामान्य जनतेचा निधी असल्याचे पाटणकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि जनतेचा विश्वास कायम राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्यामुळे २०२२-२३ पासून आजपर्यंत शासनाच्या विविध योजना, कर, अनुदान आणि इतर माध्यमांतून ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या सर्व निधीचा तपशीलवार हिशेब तपासावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रत्येक विकासकामाची ‘कसोटी’वर तपासणी करा

पाटणकर यांनी केवळ कागदोपत्री आर्थिक तपासणी न करता प्रत्यक्ष विकासकामांचीही पाहणी करण्याची मागणी केली आहे. मंजूर निधी, प्रत्यक्ष खर्च, कामाची गुणवत्ता, लाभार्थी, संबंधित कंत्राटदार अथवा पुरवठादार आणि देयके यांची तपासणी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामपंचायतीची बँक खाती, रोकडवही, लेजर, व्हाऊचर, बिले, चेक व ऑनलाइन व्यवहार, मोजमाप पुस्तिका (MB), ठराव पुस्तिका तसेच संबंधित आर्थिक कागदपत्रे तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.

१ कोटीहून अधिक रकमेच्या कथित अनियमिततेवर स्वतंत्र चौकशी

निवेदनात नमूद करण्यात आलेल्या सुमारे १ कोटी १ लाख ७१ हजार ६९८.५३ रुपयांच्या कथित आर्थिक अनियमिततेची स्वतंत्रपणे चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी पाटणकर यांनी केली आहे.

चौकशीत गैरव्यवहार किंवा शासकीय निधीचा गैरवापर आढळल्यास संबंधित जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करून शासनाच्या निधीची वसुली करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘व्यक्तिगत आकस नाही; ग्रामपंचायतीत पारदर्शकता हवी’

आपली भूमिका कोणत्याही व्यक्तीविरोधातील वैयक्तिक द्वेष किंवा आकसातून नसल्याचे स्पष्ट करत पाटणकर यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता निर्माण व्हावी, जनतेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा आणि ग्रामस्थांचा प्रशासनावरील विश्वास कायम राहावा, हा निवेदनामागील उद्देश असल्याचे नमूद केले आहे.

तसेच संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन २०२२-२३ पासून आजपर्यंतच्या जमा-खर्चाचे निष्पक्ष सामाजिक अंकेक्षण करून त्याचा अहवाल ग्रामसभेत सादर करावा, अशी अंतिम मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनाच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी गडचिरोली, तहसीलदार कुरखेडा आणि ग्रामपंचायत गोठणगाव यांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आल्या आहेत.

आता प्रशासन या मागणीची दखल घेऊन चौकशीचे आदेश देते का आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचा हिशेब ग्रामसभेसमोर येतो का, याकडे गोठणगाव ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!