September 8, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

गेवर्धा शाळेत बालगोविंदांचा जल्लोष; दहीहंडी उत्सव उत्साहात

“श्रीकृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी रंगविला गोकुळाष्टमीचा सोहळा; मानवी मनोरे रचत फोडली दहीहंडी”

कुरखेडा, ८ सप्टेंबर : गेवर्धा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी निमित्त दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. बालगोपालांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण शाळेचे वातावरण कृष्णमय झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व आरती करून करण्यात आली. यानंतर शाळेच्या सभागृहात लहान व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी बांधण्यात आली. ‘गोविंदा रे गोपाळा’ आणि ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

बालगोविंदांनी एकावर एक मानवी मनोरे रचत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी फोडली. हंडी फुटताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जल्लोषात आनंद व्यक्त केला. त्यानंतर ‘रडू नको बाळा, मी पाण्याला जाते’ या गीतावर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकात्मक नृत्याने कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

उत्कृष्ट वेशभूषा करणाऱ्या तसेच दहीहंडी फोडणाऱ्या बालगोविंदांचे शाळेच्या वतीने कौतुक करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ताहीर शेख, उपाध्यक्ष सुषमा इंदुरकर, सदस्य देवलाल कवडो, सारिका गायकवाड, निराशा वट्टी, मुख्याध्यापक दखने सर, गोंगले मॅडम, अलोने मॅडम, फटिंग मॅडम, शेजल मॅडम तसेच शाळेच्या मध्यान्ह भोजनासाठी कार्यरत महिला उपस्थित होत्या.

मुख्याध्यापक दखने सर यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना पोहे व प्रसादाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे दहीहंडी उत्सव अविस्मरणीय ठरला.

About The Author

error: Content is protected !!