संविधानाला अभिवादन, रुग्णांना मदतीचा हात! आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा
गडचिरोली : २६ नोव्हेंबर : आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. राजकीय उत्सवाला सामाजिक सेवेची जोड देत पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त करण्यात आली.
यानंतर महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले. तसेच ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमांतर्गत गरजू रुग्ण व नागरिकांसाठी भोजनदान करण्यात आले. सामाजिक संवेदनशीलता, सेवाभाव आणि सामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी, जिल्हा सहसचिव संतोष कोडापे, जिल्हा संघटनमंत्री शत्रुघ्न ननावरे, तालुका उपाध्यक्ष रवींद्र सिडाम, तालुका सहसचिव खोमेश बोबाटे, तालुका सचिव संदीप गेडाम, तालुका अध्यक्ष निखिल चावरदाणे, तालुका महासचिव रवींद्र धाकडे, हर्षा कोडापे, तुषार मडावी, प्रीतम मडावी, जिल्हा युवा अध्यक्ष तसेच मोसम मेश्राम यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजसेवा आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी असले पाहिजे, हा संदेश आम आदमी पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून देण्यात आला.
