“मोहफुलांच्या पारंपरिक पाककृतीला उच्चशिक्षित सुश्मिताने दिली आधुनिकतेची जोड”
1 min read“आम्ही आपल्या आरोग्या’साठी संस्थेच्या पुढाकाराने शाश्वत रोजगाराकडे वाटचाल”
गडचिरोली : दुर्गम, अतिदुर्गम भागातील जंगलात सहज आढळणाऱ्या मोहफुलांच्या वेचणीतून आदिवासींना रोजगार मिळतो; पण आरोग्यर्वधक असलेल्या या फुलांचा वापर पाककृतीसाठी केला तर शाश्वत रोजगार मिळू शकतो, हीच संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेच्या प्रकल्प समन्वयक सुश्मिता हेपट यांनी पाककृतीत संशोधन केले. पारंपरिक पाककृतीला आधुनिकतेची जोड देत विविध पदार्थांची निर्मिती करण्याचा सफल प्रयोग केला आहे.
मोहफुलांपासून दारू काढली जाते, हे सर्वश्रूत आहे; पण फुला-फळांपासून वनौषधीही बनवल्या जातात. मार्च महिन्यात मोहफुले येतात, ती वेचणीची कामे सध्या सुरू आहेत. यामुळे आदिवासींना चार पैसे मिळतात; पण शाश्वत रोजगार मिळावा, यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख या दाम्पत्याच्या आम्ही आमच्या आरोग्यासाठी या संस्थेने कुरखेडा येथे महिलांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने गडचिरोली जिल्ह्यासाठी मोहफूल आदिवासींच्या उपजीविकेचे एक साधन हा प्रकल्प हाती घेतला आहे, त्याअंतर्गत बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आदिवासी महिलांना हे प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्ह्यात ५०० महिलांना प्रशिक्षित करून नंतर त्यांच्या माध्यमातून पाच हजार कुटुंबांना मोहफुलांच्या पाककृतीतून रोजगाराचे नवे दार उघडण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. महामंडळाच्या आठ वंदन केंद्रातून या पदार्थांची विक्री केली जाते. मोहफुलांतून तुटपुंजे पैसे मिळत; पण प्रक्रिया करून बनविलेल्या मोहफुलांच्या पदार्थांना चांगला दर मिळत आहे.
शिबिरातून अनुभवले लोकजीवन, आदिवासींसाठी काम करण्याचा निर्णय २३ वर्षीय सुश्मिता ऋषी हेपट या मूळच्या बल्लारपूर (ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी. दहावीनंतर त्यांनी बामनी येथील बीआयटी संस्थेतून अन्नतंत्र पदविका मिळवली. पुढे अमरावतीतील संत गाडगेबाबा विद्यापीठात केमिकल अँड फूड टेक्नॉलॉजी पदवी संपादन केली. याच दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मेळघाटात पार पडले. स्वयंसेवक म्हणून सुश्मिता यांनी तेथील लोकांचे जीवनमान जवळून अनुभवले. कुपोषणाचे अधिक प्रमाण असल्याने आदिवासींना पोषणाविषयी माहिती देण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानंतर त्या ‘आम्ही आपल्या आरोग्या’साठी संस्थेशी जोडल्या गेल्या. चिक्की, लाडू, कुकीज, कँडी चॉकलेट अन्…. मोहापासून आदिवासींमध्ये लोऱ्या, पुरणपोळी, भजी, राब हे पारंपरिक पदार्थ बनविले जात. सुश्मिता हेपट यांनी लोणचे, कँडी, चॉकलेट, कुकीज, गुलाबजाम, बिस्कीट, नाचणी या नव्या पदार्थांच्या निर्मिती केली आहे. मैद्याऐवजी नाचणी व साखरेऐवजी गुळाचा वापर करून हे पदार्थ बनविले जातात.
मोहफूल गुणवर्धक, दूध, मनुक्यालाही भारी मोहफूल गुणवर्धक असून, दूध व मनुक्यापेक्षा अधिक प्रोटिन असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. मोहफुलामध्ये प्रोटीन १.४० टक्के, खनिज ७०, काबरेहायड्रेड २२.७०, कॅलरिज १११, कॅल्शियम ४५, लोहतत्त्व २३ तर व्हिटॅमिन सी ४० टक्के आहे. या फुलांपासून तेल, कपडे धुण्याचे साबण, मेणबत्ती, सॅनिटायझर अशा विविध वस्तूही तयार होतात.