April 26, 2025

“दलित कुटूंबातील एका तरुण युवकाला वनकर्मचाऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यु! सिरोंचा वन विभागातील धक्कादायक प्रकार !”

“गडचिरोली येथे पत्रकार परिषदेत मृताच्या भाऊ-बहिणीचा आरोप!”

गडचिरोली, अन्वर शेख; (प्रतिनिधी); ५ जुलै: फिरायला गेलेल्या भावाला वनकर्मचा-यांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याने गंभीर अवस्थेत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान स्थानिक पोलिस पाटीलांनी तक्रार दिल्यास तुम्हालाही कारागृहात जावे लागेल, अशी भीती दाखविल्याने यासंदर्भात कुठलिही तक्रार आम्ही केली नाही. मात्र मृतक भाऊ रेड्डी बुचय्या जाडी याचा मृत्यू वनकर्मचा-यांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप करीत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी मृतकाचे भाऊ चिन्नालचन्ना बुचय्या जाडी व दुर्गु जिमडे यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली.

पत्रकार परिषदेत माहिती देतांना मृतकाचा भाऊ चिन्नालचन्ना जाडी याने सांगितले की, 24 जुन रोजीच्या रात्री भाऊ गावातील इतर सहका-यांसोबत जंगलात गेला होता. यादरम्यान गस्तीवर असलेल्या वनकर्मचा-यांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. पहाटेच्या सुमारास अंगावरील जखमा बघून सविस्तर विचारणा केली असता त्याने वनकर्मचा-यांनी मारहाण केल्याचे सांगितले. दरम्यान तेलंगणा राज्यातील मंचेरियल येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी स्थानिक पोलिस पाटील व पोलिस अधिकारी, कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी पोलिसांनी वाहनात बसून पोलिस ठाण्यात नेले यादरम्यान पोलिस पाटीलांनी तुम्ही याची तक्रार दिल्यास तुम्हीच यात फसून कारागृहात जाल, अशी भीती दाखवली. या भीतीपोटी आम्ही कोणतीही तक्रार दिली नाही. मात्र मृत्यूपूर्वी भाऊ रेड्डी बुचम्म जाडी याने भावाला वनकर्मचा-यांनी मारहाण केल्याचे सांगितले होते. त्यामुळे भावाचा मृत्यू वनकर्मचा-यांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट होते. घटनेप्रसंगी असलेल्या त्याचे साथीदारांची सविस्तर चौकशी करुन माहिती घेतल्यास सदर प्रकार उघडकीस येऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितावर खुनाचा गुन्हा दाखल करीत आम्हाला न्याय द्यावा, अशी आर्त साद मृतकाच्या पिडीत कुटूंबियांनी यावेळी केली. पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार, यशवंत त्रिकांडे, अरुण शेडमाके, ईश्वर गावडे, साईकिरण गड्डम, गौरव उलपूलवार आदी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!