April 23, 2026

धमदीटोल्यात बिबट्याचा दहशतीचा धुमाकूळ कायम; लघुशंकेसाठी घराबाहेर गेलेल्या युवकावर हल्ला, गंभीर जखमी

कुरखेडा, २५ फेब्रुवारी – गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील धमदीटोला (धमदिटोला) परिसरात गेल्या पाच-सहा दिवसांपासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, आता त्याने आणखी एका युवकावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. काल रात्री घरामागे लघुशंकेसाठी गेलेल्या सदानंद धरमदास उईके (वय ३२) या युवकावर बिबट्याने अचानक झडप घातली. हल्ल्याच्या जोरात युवकाची किंचाळी ऐकून कुटुंबीय व शेजारी धावले, तेव्हा बिबट्या पळून गेल्याने युवकाचे प्राण वाचले.

हल्ल्यात सदानंद उईके गंभीर जखमी झाले असून, रात्रीच गस्तीवर असलेल्या वनविभागाच्या चमूने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मागील काही दिवसांत या बिबट्याने परिसरात दहशत पसरवली आहे. यापूर्वी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याला पिटाळून लावताना दोन युवक जखमी झाले होते. तसेच सदानंद उईके व दुसऱ्या एका शेतकऱ्याच्या गायीचा वासरूही या बिबट्याने ठार मारला आहे.

या घटनेमुळे धमदीटोला गावकरी प्रचंड भीतीच्या सावटाखाली आहेत. रात्री व पहाटे घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. गावकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून, बिबट्याच्या सतत वावरीमुळे शेती-शेतकरी कामेही अडचणीत आली आहेत.

आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष जयंत पाटील हरडे, माजी पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, माजी पंचायत समिती सदस्य धरमदास उईके यांनी जखमी युवकाची भेट घेतली. त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कवाडकर यांच्याकडून उपचारांची माहिती घेतली. तसेच वन परिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत गोपूलवाड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून बिबट्याला तातडीने पिंजऱ्यात बंदिस्त करून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी मागणी केली. याशिवाय तीनही जखमी युवकांना तसेच वासरू ठार झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त वाढवणे आदी उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत. बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!