April 24, 2026

नक्षल चळवळीचा कणा मोडला! सर्वोच्च नेता देवजीसह चार बड्या नेत्यांचं आत्मसमर्पण

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या लाल साम्राज्याला मोठा धक्का! माओवादी कम्युनिस्ट पक्षाचा महासचिव थिप्परी तिरुपती उर्फ देवजी (६२) आणि केंद्रीय समिती सदस्य मल्लाराजी रेड्डी उर्फ संग्राम (७६) यांच्यासह चार बड्या नेत्यांनी मंगळवारी (दि. २४) तेलंगणा पोलिसांच्या समोर अधिकृतरित्या आत्मसमर्पण केलंय. हे चार नेते म्हणजे देवजी, संग्राम, तेलंगणा राज्य समितीचे सचिव बडे चोक्का राव उर्फ दामोदर (४७) आणि राज्य समिती सदस्य नुने नरसिम्हा रेड्डी उर्फ गंगन्ना (६२).

तेलंगणाचे पोलिस महासंचालक बी. शिवाधर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत हे वृत्त अधिकृतपणे जाहीर केलं. ‘पुढारी’ने २३ फेब्रुवारीच्या अंकात याबाबत बातमी दिल्यानंतर आज हे आत्मसमर्पण औपचारिकरित्या समोर आलं. देवजी हे माओवादी संघटनेचे सर्वोच्च नेता होते. बसवराजूच्या एनकाउंटरनंतर त्यांना महासचिवपद मिळालं होतं. चार दशकांहून अधिक काळ जंगलात राहून गनिमी काव्याने लढणारा हा ‘मास्टरमाइंड’ आता शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात आलाय.

देवजीने सांगितलंय की, वाढतं वय आणि प्रकृतीच्या तक्रारींमुळे चळवळ सोडत असल्याचं. तरीही शस्त्र सोडलं तरी लोकांच्या हितासाठी क्रांतिकारी विचाराने काम करणार असल्याचं त्याने स्पष्ट केलंय. हे आत्मसमर्पण देशातील नक्षल चळवळीला जवळपास संपुष्टात आणणारं ठरणारं आहे. आता फक्त माजी महासचिव मुप्पाला लक्ष्मण राव आणि पॉलिट ब्युरो सदस्य मिशिर बेसरा यांच्या आत्मसमर्पणाची प्रतीक्षा आहे.

मागील तीन वर्षांत तेलंगणात एकट्या ५९१ नक्षल्यांनी शरणागती पत्करलीय. यात ४ केंद्रीय समिती सदस्य, १६ राज्य समिती सदस्य आणि २६ विभागीय समिती सदस्यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. तेलंगणा, छत्तीसगड आणि गडचिरोली सीमेवरील करेगुट्टा टेकडीसह तीव्र कारवायांमुळे हे मोठं यश मिळालंय.

गडचिरोली जिल्ह्यातील लोकांसाठी हा दिवस ऐतिहासिक ठरलाय. वर्षानुवर्षे दहशतीच्या सावटाखाली राहिलेल्या आदिवासी बांधवांना आता शांततेचा आणि विकासाचा मार्ग मोकळा होत चाललाय. देवजीसारख्या नेत्याच्या शरणागतीने नक्षलवादाचा ‘काऊंटडाऊन’ आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय!

About The Author

You may have missed

error: Content is protected !!