April 25, 2026

श्रीराम विद्यालयाने राज्यस्तरीय अभियानात मिळवले प्रथम क्रमांक, ११ लाखांचे बक्षीस जाहीर

गडचिरोली, २५ फेब्रुवारी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राबवण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानाच्या टप्पा ३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यातील श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, कुरखेडा याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेला ११ लाख रुपयांचे आकर्षक बक्षीस जाहीर झाले आहे.

या अभियानांतर्गत शाळांच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, शैक्षणिक गुणवत्ता, शासन धोरणांची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने शाळेची सखोल तपासणी केली. उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, स्वच्छ परिसर, विद्यार्थी कल्याणासाठी उपलब्ध सुविधा आणि विविध उपक्रमांची दखल घेत समितीने गडचिरोली जिल्ह्यातून श्रीराम विद्यालयाला प्रथम स्थान बहाल केले.

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१३८/एसडी-६ (महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग) अंतर्गत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. खाजगी व्यवस्थापनांतर्गत चालवल्या जाणाऱ्या या शाळेने आदिवासी ग्रामीण भागातील शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी दाखवली आहे. शाळेने तालुक्यात प्रथम स्थान मिळवून विभागीय स्तरावर झेप घेतली आहे.

शाळेचे प्राचार्य नागेश्वर फाये यांनी सांगितले की, संस्था अध्यक्ष मोहनरावजी अरमरकर, कोषाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष वामनरावजी फाये, संस्था सचिव दोषहरराव फाये, शाळा समिती सदस्य चांगदेव फाये यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी संघ, शाळा व्यवस्थापन समिती व शाळा समितीच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. प्राचार्य महोदयांनी सर्व शुभचिंतकांचे आभार मानले असून, भविष्यातही शैक्षणिक गुणवत्ता आणि सर्वांगीण विकासासाठी शाळा कटिबद्ध राहील, अशी भावना व्यक्त केली.

परिसरातील नागरिक, पालक आणि शैक्षणिक वर्तुळातून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदिवासी बहुल ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या श्रीराम विद्यालयाच्या या यशाने जिल्ह्यातील इतर शाळांसाठी प्रेरणास्थान निर्माण झाले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!