“जीवन संगिनिनेच संपविली “लखनची” जीवन यात्रा; दवंडी हत्याकांडात पत्नीच निघाली मुख्यसुत्रधार”

“गावातील एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने हा हत्येचा कट रचण्यात आला होता अशी माहीती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.”
गडचिरोली;(प्रतिनिधी); १४ ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील पोमके बेडगाव अंतर्गत येत असलेल्या दवंडी येथे १२ ऑक्टोबर रोजी लखन सोनार (अंदाजे वय ३२) याची गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र यातील आरोपी कोण याचा शोध पोलीस करीत होते. मात्र या हत्येतील आरोपींचा शोध लागला आहे. पत्नीचा या हत्येमध्ये समावेश असून पत्नीचे इतर एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्याने हा हत्येचा कट रचण्यात आला होता अशी माहीती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी बळीराम गावडे रा. कुकडेल, सहकारी सुभाष नंदेश्वर रा. दवंडी व पत्नी सरीता सोनार यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान हत्या केल्यानंतर पत्नी सरीताने पोलिसांना सांगितले कि, आम्ही सर्व रात्रोच्या सुमारास झोपून असताना रात्रो ११ वाजताच्या सुमारास अचानक दरवाजा ठोठावला. दरवाज उघडला असता पाच ते सहा च्या संख्येत काळे कपडे परिधान केलेले अज्ञात इसम घरात शिरले व आरडाओरड करून नये म्हणून चाकूचा धाक दाखवत पती लखन ची गळा चिरून हत्या केली. याबाबत पोलिसांनी अधिक तपास केल्याने संशयाची सुई पत्नीकडे भिरकल्याने तपासाची चक्रे अधिक गतीने फिरवित सखोल तपासादरम्यान पत्नीने घटनाक्रमाचा बनाव केल्याचे लक्षात आले. दरम्यान पत्नी सरिताचे हिचे दवंडी येथील सुभाष नंदेश्वर या इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असल्याची माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे तपासाची दिशा ठरवत सरिताकडे अधिक विचारपुस करण्यात आली असता सुरुवातीला तिच्याकडुन उडवाऊडवीची उत्तरे देण्यात आली. त्यानंतर तिला विश्वासात घेऊन विचारपुस केली असता, तिने प्रियकर व त्याच्या साथीदाराच्या मदतीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पतीच्या त्रासाला कंटाळुन सरिता हिने तिचा प्रियकर सुभाष नंदेश्वर याला सर्व हकिकत सांगत पतीचा काटा काढावा या करीता तगादा लावला. त्यावर ९ ऑक्टोबर रोजी लखन सोनार याच्या हत्येचा कट रचुन हत्येची जबाबदारी बळीराम गावडे रा. कुकडेल यांचेकडे देण्यात आली.११ ऑक्टोबर च्या रात्री अंदाजे १०. ४५ वाजता बळीराम गावडे याने मय्यताची पत्नी सरिता हिच्या मदतीने घरात प्रवेश केला व धारदार शस्त्राने लखन सोनार याची निर्घृण हत्या करुन निघुन गेला. सदर घटनेतील सर्व कबुली पत्नी सरिता हिने दिलेली असुन गुन्ह्रातील सर्व आरोपी सरिता लखन सोनार, सुभाष हरिराम नंदेश्वर दोघेही रा. दवंडी व बळीराम गावडे रा. कुकडेल यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा साहील झरकर सा. यांच्या मार्गदर्शनात पोलीस मदत केंद्र, बेडगाव चे प्रभारी अधिकारी पोउपनि विठ्ठल सुर्यवंशी हे करीत आहेत.
“हत्येने विविध चर्चेला उधाण”
हत्या घडल्यानंतर व पत्नीने पोलिसांना सांगितल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. दरम्यान हि हत्या नक्षल्यांकडून तर करण्यात आली नाही असा देखील सूर उमटत होता. मात्र पोलिसांनी तपस अधिक जलद गतीने करत मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळत विविध चर्चेला थांबविले आहे.