डॅाक्टर युवतीची वैनगंगा नदीत उडी घेत आत्महत्या ; आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १८; (वडसा) : ब्रह्मपुरीतील एका एमबीबीएस डॅाक्टर झालेल्या 24 वर्षीय तरुणीने देसाईगंज तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे ती पाण्याच्या प्रवाहात वाहून जात असताना अनेक लोक हे दृष्य पहात होते. अनेकांनी हे दृष्य आपल्या मोबाईलमधील कॅमेरात कैद केले, पण तिला वाचविण्यासाठी कोणी पुढे सरसावले नाही.
ईशा घनश्याम बिंजवे (24 वर्ष) असे त्या डॅाक्टर युवतीचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ईशा वैनगंगा नदीच्या पुलावर आली. तिथे आपली अॅक्टिव्हा गाडी उभी करून तिने पायातील चप्पल काढून ठेवली. त्यानंतर नदीपात्रात उडी घेतली. पण त्या ठिकाणी पाणी कमी असल्यामुळे तीने पुन्हा खोल पाण्यात उडी घेतली. यानंतर ती खोल पाण्याच्या प्रवाहाकडे वाहात गेली. बऱ्याच अंतरापर्यंत ती पाण्यात बुडालेली नव्हती. त्यामुळे तिला पोहता येत असावे असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
बुधवारी सायंकाळी निरज गावाजवळील पात्रात ईशाचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.