“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना; केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील”
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै १८ ; (गडचिरोली ) : जिल्ह्यातील काही राजकीय व सामाजिक संघटना कॅम्प आयोजित करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे अर्ज भरून घेत असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त होत आहेत. अर्ज भरून देण्यासाठी सदर संघटनांकडून पैशाची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच चुकीचा अर्ज भरल्यास अथवा अर्ज शासनाकडे सबमिट न झाल्यास संबंधित पात्र महिला लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे केवळ शासकीय केंद्रावर भरले जाणारे अर्जच पडताळणीसाठी ग्राह्य धरले जातील अशा सूचना देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्वाकांक्षी योजनांबाबत आढावा बैठक आज घेण्यात आली. राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित क्षेत्रीय अधिकारी आदी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. गडचिरोली येथून जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग व संबंधीत अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीला उपस्थित होते.
मुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील पात्र महिलांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी आपले अर्ज शासनाने प्राधिकृत केलेल्या अंगणवाडी केंद्र, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये (नागरी/ग्रामीण/आदिवासी) तसेच ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र, नगरपालिका/नगरपंचायतीचे मदत केंद्र या अधिकृत केंद्रावरच भरावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. या योजनेत नोंदणी करताना कुठेही महिला-भगिनींची अडवणूक होता कामा नये अशा सूचना देतांनाच अर्जासाठी पैशांची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.