“पुलावर कचरा साचल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ”
1 min readगडचिरोली, जुलै २५ : मागील एक वर्षांपासून आलापल्ली-मुलचेरा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांसह वाहनधारक हैराण झाले आहेत. या रस्त्यावर जीवघेणा प्रवास सुरु असल्याने नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला जात असताना नुकतेच आलेल्या पुरामुळे पुलावर साचलेला कचरा साफ करण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नसल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे दिसून येत आहे.
मुलचेरा तालुक्यातील गोमणी पासून तर विवेकानंदपूर पर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याने आता पावसाळ्यात त्या खड्डयांना तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यावर मुलचेरा तालुका मुख्यालयात शिक्षण घेण्यासाठी शेकडो विध्यार्थी दररोज ये-जा करतात. विविध कार्यालयात कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांची संख्या देखील तितकीच आहे. एवढेच नव्हेतर कर्मचारी आणि अधिकारी देखील याच रस्त्याने ये-जा करतात. या सर्वांना याचा जबर फटका बसत आहे.
मागील एक वर्षांपासून या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष झाल्याने परिणामी खड्डयांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण देखील
वाढले आहे. सदर रस्त्यावर दुचाकी चालविणे कठीण झाले असून एसटी बस आणि इतर खाजगी वाहनधारक कसा प्रवास करत असतील याचा विचार न केलेला बरा.
गेली पाच दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. नुकतेच चार दिवसांपूर्वी आंबटपल्ली आणि खुद्दीरामपल्ली दरम्यान असलेल्या नाल्याला पूर आला होता. पूर ओसरला असला तरी पुराच्या पाण्याने पुलावर साचलेला गाळ आणि कचरा साफ करण्यात आला नाही. एकीकडे कचरा साचला तर दुसरीकडे खड्डयात पाणी साचला आहे. त्यामुळे या पुलावर देखील अपघाताची शक्यता बळावली आहे. मागील चार दिवसांपासून पुलावर कचरा पडून आहे मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नाही.
आलापल्ली ते आष्टी मार्गावर खड्डयांचा साम्राज्य निर्माण झाल्याने खाजगी वाहनधारक मागील दोन वर्षांपासून आलापल्ली ते मुलचेरा याच मार्गाचा अवलंब करत आहेत. सध्या आलापल्ली ते आष्टी रस्त्यावरील दीना नदीवरील पूल पाण्याखाली आल्याने हाच एक पर्यायी मार्ग वापरण्यात आला. अश्या परिस्थितीत या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे.