“प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेवटचे दोन दिवस;जिल्ह्यात आतापर्यंत ७६ हजार शेतकऱ्यांचा सहभाग”
1 min readगडचिरोली, जुलै २९ : “प्रधानमंत्री पीक विमा योजना” खरीप हंगाम-२०२४ मध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन विमा अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस उरले असून या योजनेत शेतकऱ्यांना सहभाग नोंदविण्याचे आवाहन, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोडी यांनी केली आहे.
या योजनेत सहभागी होण्याकरिता केवळ १ रुपया भरुन PMFBY पोर्टल http://pmfby.gov.in वर शेतकऱ्यांना स्वत: तसेच बँक विमा कंपनीचे नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इन्शुरन्स ॲप व सामुहिक सेवा केंद्रांमार्फंत योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे.
या योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२४ करिता ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जून २०२४ पासून सुरू झाली होती. योजनेत सहभागासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने खरीप हंगाम ऑनलाईन विमा भरण्यास ३१ जुलै २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
जिल्ह्यात ७६ हजार ८५८ शेतकऱ्यांचा सहभाग
गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २९ जुलै २०२४ पर्यंत ७६ हजार ८५८ शेतकऱ्यांनी ७३ हजार ३७ हेक्टर क्षेत्रातील पीकाचा विमा उतरवून या पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. मागील वर्षी खरिप हंगामात १ लाख २५ हजार ९९४ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.