December 23, 2024

“बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडपने पडले महागात ; चातगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पडवे निलंबित”

1 min read

  • वनातील कामांमध्ये घोळ केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी.पडवे यांना निलंबित…

गडचिरोली  न्यूज नेटवर्क, जुलै ३१ : चातगाव वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोपवन लागवड, खोदतळे, रोहयोची कामे, वाघांच्या संवर्धन, तसेच साहित्य खरेदीमधील कोटेशन, जीएसटीची बिले तपासण्याची विजय खरवडे यांनी मागणी केली होती. तसेच वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या निर्देशावरून वनरक्षक, वनपालांनी अनेक कामांवर अनेक बोगस मजूर दाखवून शासकीय निधी हडप केला असल्याची तक्रारीत म्हटले आहे.

वनविभाग गडचिरोली अंतर्गत येत असलेल्या चातगाव वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोपवन लागवड, खोदतळे, रोहयोची कामे, वाघांच्या संवर्धनासह अन्य कामांमध्ये घोळ केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. पडवे यांना निलंबित करण्यात आले. भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी कामांची तक्रार वरिष्ठांपर्यंत झाल्यानंतर त्या कामांची चौकशी करण्यात आली असून पडवे हे प्रथमंता दोषी आढळून आले आहेत.

चातगाव वनपरिक्षेत्रात मार्च 2021 ते 2024 पर्यंत करण्यात आलेली रोपवन लागवड, हेक्टरी मोजमाप, हेक्टरी लावण्यात आलेली झाडे आणि जगविलेली झाडे, प्रत्यक्ष लागवड न करता पैशाची उचल करणे असे अनेक आरोप ठेवत भारतीय जनसंसदचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी तक्रार केली होती. प्रत्येक कामावर लावलेल्या मजुरांचे व्हाऊचर, मजुरांच्या सह्यांची खात्री करणे, मोजमाप पुस्तिका, प्रत्येक मजुराची प्रत्येक कामावरील बँक खाते पुस्तिका तपासून घेतल्यास हा घोळ स्पष्टपणे दिसणार असल्याचे त्यांनी वनमंत्री, वन सचिवांकडे केलेल्या तक्रारीत म्हटले होते.

“चांतगाव वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वनातील कामात अनियमितता असून चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनपालामार्फत लाच देण्याचा प्रकार केल्याचा आरोप करीत तक्रार दाखल केल्याने चौकशीची प्रथमतः दोषी आढळल्याने निलंबन केले आहे.”

एस. रमेश कुमार, मुख्य वनसंरक्षक, गडचिरोली वनवृत्त गडचिरोली

About The Author

error: Content is protected !!