गडचिरोली जिल्ह्याचे गॅझेटीअर तयार होणार
कार्यकारी संपादक तथा सचिव डॉ.दिलीप बलसेकर यांनी जिल्हा गॅझेटिअर निर्मितीबाबत घेतली बैठक
गडचिरोली,(जिमाका)दि.20: दर्शनिका (गॅझेटीअर) विभाग, महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी संपादक व सचिव श्री. डॉ. दि.प्र. बलसेकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे गडचिरोली जिल्हा गॅझेटिअर निर्मितीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. गडचिरोली जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, सांस्कृतिक ओळख सांगणारे परिपूर्ण असे गॅझेटीअर तयार करण्यात येणार आहे. हे गॅझेटीअर पुढील सहा महिन्यात तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी अधिकारी/कर्मचारी या बैठकीला मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकित उपस्थितांचे आभार माणून विषयाशी संबंधीत अधिकाऱ्यांना गॅझेटिअर बाबत माहिती देतांना बलसेकर यांनी सांगितले की, राज्य शासनाला सर्व जिल्ह्यांचे गॅझेटिअर बनवून द्यायचे आहे. त्यामुळे आपण तळमळीने लवकरात लवकर आपल्या संबंधीत माहिती दिली तर गॅझेटीअरचे काम वेळेत पुर्ण होऊ शकेल.
गॅझेटिअर हे ब्रिटीशकाळापासून वापरात असून ब्रिटीश लेाक जेव्हा येथे आले ते येथील भौगोलिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीशी अवगत नव्हते. त्यावेळेस त्यांना गॅझेटिअरची खूप मदत झाली. आजही आपण एखादी माहिती शोधण्याकरीता जुने गॅझेट उपयोगात आणतो. हायकोर्टानेही काही निर्णय देतांना गॅझेटिअरची मदत घेतली आहे. यातच गॅझेटीअर चे महत्व विशद होते. गॅझेटिअर हे भविष्यासाठी उत्तम असून आपल्याला पाहिजे असलेली जुनी माहिती येथील संस्कृती, भौगोलिक रचना माहित होते. त्यामुळे हे काम करतांना भूमिपुत्रांना माहिती गोळा करतांना समाविष्ट करुन घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांनी ऐतिहासिक ठिकाणे, पर्यटन स्थळं, ब्रिटीशकाळीन वास्तुशिल्पाचे छायाचित्र गॅझेटिअरसाठी लागणार असल्यामुळे ते गोळा करण्याचे निर्देश दिले. यावेळी सचिव श्री बलसेकर यांचे स्वागत निवासी उपजिल्हाधिकारी समाधान शेंडगे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ यांनी मानले. गोंडवाना विद्यापीठाचे प्राध्यापक नरेश मडावी यांनी गॅझेटीअर बाबतची माहिती कार्यकारी संपादक तथा सचिव यांना दिली.
जिल्हा गॅझेटीअरमध्ये बारा प्रकरणांचा समावेश असणार : श्री बलसेकर यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की या गॅझेटिअरमध्ये वेगवेगळ्या विषयानुसार 12 प्रकरणांचा समावेश असेल. यामध्ये जिल्ह्याचा भूगोल, जिल्ह्याचा इतिहास, येथील लोकसंस्कृती, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यापार व वाणिज्य, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती व प्रेक्षणीय स्थळे या प्रकरणांचा समावेश आहे. यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग काम करणार आहेत तसेच विदर्भातील इतिहासावरती अभ्यास करणारे गोंडवाना विद्यापीठासह इतर विद्यापीठातील प्राध्यापक यांची निवड या जिल्हा गॅझेटिअर निर्मितीसाठी केली जाणार आहे.
श्री बलसेकर यांनी वेगवेगळ्या ठिकाणी दिली भेट : जिल्हा गॅझेट निर्मितीच्या अनुषंगाने श्री बलसेकर यांनी गोंडवाना विद्यापीठातील कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची भेट घेतली. तसेच त्यांनी सर्च शोध ग्राम येथे जाऊन सामाजिक सेवा बद्दल माहिती जाणून घेतली त्यानंतर त्यांनी मेंढा लेखा येथे देवाजी तोफा यांचे कार्य जाणून घेतले.