“शिक्षणातून प्रगती साधा, गडचिरोली येथे इतर मागासवर्ग वसतीगृहाचे उद्घाटन प्रसंगी अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे उपस्थितांना आव्हान”
1 min readगडचिरोली, ऑगस्ट १५ : शिक्षण हे प्रगतीचे द्वार आहे, ते तुम्हाला कधीही रिकामे बसू देणार नाही, त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण घेवून वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवा, असा सल्ला अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विद्यार्थ्यांना दिला.
गडचिरोली येथे इतर मागास वर्गीय मुलींचे व मुलांच्या स्वतंत्र शासकीय वस्तीगृहाचे उद्घाटन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार डॉ. देवराव होळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जात पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री आत्राम यांनी पुढे सांगितले की शिक्षणाचा प्रसार आणि रोजगार उपलब्धता हा आपला मुख्य अजेंडा असून त्यासाठी नियमित कार्यरत राहील. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शहरात येवून उच्च शिक्षण घेणे सोयीचे व्हावे म्हणून शासनातर्फे येथे इतर मागासवर्गीय मुला-मुलींकरता वसतीगृह सुरू करण्यात आले. या वसतीगृहाचे आज उद्घाटन करतांना मला आनंद होत आहे. सध्या या वसतीगृहात मुलींसाठी शंभर व मुलांसाठी शंभर जागांची प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात इतर मागासवर्ग नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणत असल्याने वसतीगृहातील ही प्रवेश क्षमता वाढीसाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
आमच्या शासनातर्फे जनहिताच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’, मुलींना मोफत उच्च तंत्र शिक्षण, ज्येष्ठ नागरिकांसाठीची ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ आणि ‘वयोश्री योजना’, यासह शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेवून आपण विकास प्रक्रीयेत पुढे यावे असे आवाहन मंत्री आत्राम यांनी केले.
खासदार डॉ. किरसान यांनी वसतीगृहामुळे शिक्षण घेण्याच्या मिळालेल्या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. श्री अशोक नेते, डॉ. नामदेव उसेंडी, श्री प्रशांत वाघरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या मुलांसाठी व मुलींसाठी दोन स्वतंत्र वसतीगृह सुरू करण्यात येत असून बारावी नंतरच्या पुढील शिक्षणासाठी या वसतीगृहात प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले.
समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील 17 मुले व मुलींची आणि वाचनालयातील 7 विद्यार्थ्यांची गडचिरोली पोलिस दलात निवड झाली, यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री युवा रोजगार प्रशिक्षण योजने अंतर्गत 3 प्रशिक्षणार्थींना समाज कल्याण विभागात प्रशिक्षणासाठी रुजू आदेश देण्यात आले. मंत्री धर्मरावबाबा आत्राम व मान्यवरांनी वसतीगृहाची पाहणी केली.
कार्यक्रमाला रविंद्र वासेकर, हेमंत जंगमवार, महेंद्र ब्राम्हणवाडे, गोवर्धण चव्हाण तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी, वसतीगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.