अहेरी न.पं. उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांच्यासह अन्य नगरसेवकांचा ‘राकाँ’मध्ये प्रवेश राजकीय वर्तुळात खळबळ
1 min readअहेरी, ऑगस्ट १६ : अहेरी नगर पंचायतीत आदिवासी विद्यार्थी संघटना (आवीसं) ची सत्ता आहे. अर्थात अलीकडेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची सत्ता आहे. परंतु 15 ऑगस्ट रोजी अहेरी नगर पंचायतीचे आविसं समर्थित उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांनी सहा नगरसेवकांसह मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या अहेरीच्या राजवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन व नगर पंचायतीत विकासात्मक कामात विस्कळलेली घडी नीट करण्यासाठी अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन यांनी अन्य नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘घडी’ हातात बांधली. मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये न.पं. उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, आविसंचे गट नेता विलास गलबले, बांधकाम सभापती महेश बाक्केवार, महिला व बालकल्याण सभापती मीना ओंडरे, गट नेता शिवसेना (उबाठा) विलास सिडाम, नगरसेविका (आविसं) ज्योती सडमेक व अन्य एक नगरसेवकाचा समावेश आहे.
येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात हे फार मोठे राजकीय घडामोडी असल्याचे बोलले जात असून अहेरी नगर पंचायतीला खिंडार पाडून उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन व अन्य काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष अजून नवी उभारी घेऊन विरोधकांना ‘दे धक्का’ करून चिंतेत पाडले आहे.