जिल्ह्यात कायदा व सुव्ययवस्था राखण्यासाठी कलम 36 लागू
1 min readगडचिरोली, सप्टेंबर 10 : जिल्ह्यात 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरु असून 16 सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद निमित्त मुस्लिम समाजतर्फे मिरवणूक कार्यक्रम तसेच 17 ते 19 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मुर्तीचे विर्सजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात विविध धार्मिक सण /उत्सव शांततेत पार पाडावे याकरीता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी 18 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत कलम 36 चे पोटकलम अ ते फ लागू केले आहे.
या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वागणुकीबाबत, वाद्य वाजविणे बाबत, सभेचे आयोजन व मिरवणुक काढण्याबबात, मिरवणूकीचे मार्ग निश्चित करण्याबाबत, लाऊडस्पिकर वापरण्याबाबत योग्य निर्बंध व निर्देश देण्याचे अधिकार गडचिरोली जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. यात अ) मिरवणुक व सभेच्या ठिकाणी त्यातील लोकांचे वागणुकीबाबत योग्य निर्देश देण्याचे अधिकार, आ) मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करणे तसेच धार्मिक पुजा स्थानाचे जवळ लोकांचे वागणुकीचे निर्बंध घालण्याचे अधिकार, इ) मिरवणुकीस बाधा होणार नाही, याबाबतचे आदेश तसेच धार्मिक पुजा स्थानाच्या जवळ लोकांचे वागणुकीवर निर्बंध घालण्याचे अधिकार, ई) सार्वजनिक रस्त्यावर तसेच सार्वजनिक ठिकाणी वाद्य वाजविणे, गाणी गाणे, ढोल ताशे वाजविणे इत्यादिचे निर्बंध घालण्याचे अधिकार, उ) रस्ते व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था ठेवण्यासाठी निर्देश देण्याचे अधिकार, ऊ) सार्वजनिक ठिकाणी/ रस्त्यावर लाउडस्पिकर वाजविण्यावर निर्बंध तसेच मर्यादा घालण्याचे अधिकार ऋ) कलम 33, 35, 37, ते 40, 42, 43, व 45 मुंबई पोलिस अधिनियमान्वये काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे व सुचना देण्याचे अधिकारांचा समावेश आहे.
सदर आदेश लागू असताना सभा, मिरवणुकीत वाद्य वाजविणे, लाऊडस्पिकर वाजविणे, मिरवणुकीत नारे लावणे, मिरवणुकीचा रस्ता व वेळ निर्धारित करण्यासाठी संबंधित ठाणे अंमलदार यांची परवानगी घेण्यात यावी. सर्व बाबतीत पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे सर्व पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांच्या आदेशात नमूद आहे.