दक्षिण गडचिरोलीत गांजा, तंबाखू तस्करी कोणाच्या आशीर्वादाने ?
1 min readछत्तीसगडमार्गे आवक : कारवाया थंडावल्या, व्यसनाचा विळखा
गडचिरोली न्यूज नेटवर्क , ३० डिसेंबर : दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या दक्षिण भागात गांजा व तंबाखूची तस्करी मोठ्या जोमाने सुरू आहे. अनेक जण व्यसनाला बळी पडत आहेत. शेजारच्या छत्तीसगड राज्यातून अहेरी व परिसरात गांजा, बनावट तंबाखू आणून विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याने यामागे नेमकी कोणाची राजकीय शक्ती, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भामरागडला चिकटून छत्तीसगड राज्य आहे तर काही भाग अहेरीलाही लागून आहे. यासोबतच तेलंगणा राज्याची सीमा सिरोंचाला चिकटून आहे. गडचिरोलीत दारुबंदी असल्याने अनेक जण तल्लफ भागविण्यासाठी पर्याय म्हणून गांजा व तंबाखूच्या आहारी गेलेले आहेत. अनेकांना खर्रा खाण्याची लत आहे. खर्रासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखूसह गांजा पुरविणाऱ्या टोळ्याच या भागात सक्रिय आहेत. याआडून बनावट तंबाखूही मोठ्या प्रमाणात येते. आंतरराज्य तस्करांशी स्थानिकांचे थेट कनेक्शन आहे. आंतरराज्य तपासणी नाक्यांशिवाय छुप्या मार्गावरुनही ‘माल’ योग्य ठिकाणी कसा पोहोचेल, याची व्यवस्था केली जाते. यंत्रणेतील काहींशी साटेलोटे असल्याशिवाय तस्कर एवढे धाडस कसे काय करतील, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांत गांजा व तंबाखू तस्करांवरील पोलिसांच्या कारवाया देखील थंडावल्याचे चित्र आहे. पोलिस प्रशासनासमोर या भागात नक्षल्यांचे सर्वांत मोठे आव्हान आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकीतही काही दिवस पोलिस व्यस्त होते. ही संधी साधून अनेक नवे तस्कर या धंद्यात उतरल्याचे सूत्रांनी सांगितले.