शासकीय योजनेचा लाभ वंचितांपर्यंत पोहचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
1 min read“स्थानिक उत्पादन विक्रीसाठी यशस्विनी व स्त्री शक्ती पोर्टचा वापर करावा”
गडचरोली, १३ जानेवारी : शासकीय योजनांचा लाभ ज्या भागापर्यंत अद्याप पोहचला नाही किंवा जे नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहचून व विशेष शिबीर आयोजित करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्राधाण्याने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.
महिला व बाल विकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा संबंधीत यंत्रणाकडून जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना इंगोले, बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती कडू, माविमचे सचिन देवतळे तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी पुढे सांगितले की लोकल ते ग्लोबल संकल्पनेवर स्थानिक उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने यशस्विनी व स्त्री-शक्ती पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. ऑनलाईन शॅपिंगच्या माध्यमातून बचतगटांनी तयारी केलेली नाविन्यपूर्ण व दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी या पोर्टलच्या माध्यमातून विशेष व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याबाबतची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याचे व प्रशासकीय यंत्रणेने स्थानिक उत्पादन विक्रीला वाव मिळण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बचतगटाद्वारे उत्पादित वस्तू विक्रीसाठी जिल्ह्यात मॉल तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी सांगितले.
अंगणवाडींचा आढावा घेतांना स्वत:ची जागा नसलेल्या अंगणवाडींना नवीन इमारत उपलब्ध व्हावी यासाठी नियोजन विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी यांनी महिला बाल विकास विभगाच्या स्वाधार गृह, वन स्टॉप सेंटर, महिला हेल्पलाईन 181, महिला सक्षमिकरण केंद्र, मनोर्धर्य योजना, समुपदेशन केंद्र, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, हिकरणी कक्ष आदि विविध योजनाचा आढावा यावेळी घेतला. बैठकीला संबंधीत अधिकारी उपस्थित होते.