२४ तास पहारा तरी कुरखेड्यात रेती तस्करी जोमात; चेकपोस्टच्या रात्रपाळीचे कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह

कुरखेडा, २४ फेब्रुवारी : २४ तास महसूली पहारा असूनही कुरखेडा मुख्यालय व परिसरात मोठ्याप्रमाणात रात्री रेतीची अवैध वाहतूक सुरू असून ठिकठिकाणी रेती चे ताजे ढिगार नजरेस पडत असल्याने रात्रीच्या चेकपोस्टच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
गौण खनिजाची जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात होणारी अवैध वाहतूक थांबवण्यासाठी नावनियुक्त जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा यांनी महसुली चेकपोस्ट निर्माण करून २४ तास पहारा ठेवण्याचे आदेश निर्गमित करत उपविभागीय अधिकाऱ्यांना अधिकार देत चेक पोस्ट संदर्भात नियोजन करून स्वतंत्र आदेश निर्गमित करण्याचे निर्देशित केले होते. आदेशाची औपचारिकता पूर्ण करत कुरखेडा येथे तीन ठिकाणी चौक्या उभारण्याचे काम येथील तहसीलदारांनी केले. ८ तासा प्रमाणे २४ तासात तीन पाळी नुसार महसूली कर्मचारी नियुक्त केले. या चेकपोस्ट निर्मित होवून रेती तस्करीला आळा बसेल असा सर्वसामान्यांच्या विश्वासाला तळा गेला असून चेक पोस्ट जवळूनच मोठ्याप्रमाणात रेती मुख्यालय पोहोचत असल्याने या चेकपोस्टच्या एकंदरीत कार्यशैलवर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहे.
“गस्ती पथकप्रमाणे चेकपोस्ट ही रेत तस्करांनी मॅनेज केल्याची चर्चा”
महसूल विभागाची गस्ती पथक मॅनेज करून बिनधास्त रात भर रेती उपसा करून लाखो रुपये कमावलेल्या रेती तस्करांनी आता चेकपोस्ट ही मॅनेज केल्याची जोरदार चर्चा कुरखेड्यात आहे. ज्या प्रमाणात रेती मुख्यालय व परिसरातील गावात पोहचत आहे ते पाहता खरच ह्या चेक पोस्ट मॅनेज झाल्याचे चर्चांवर विश्वास बसत असून येथील वरिष्ठ महसूली अधिकाऱ्यांच्या अवैध गौण खनिज उपशा रोखण्याची सर्व प्रयत्न निरर्थक ठरत आहेत.
अवैध मार्गाने येणाऱ्या रेतीवर महसूल प्रशासन कार्यवाही करून दंड करणार का ?
अवैध मार्गाने ठिकठिकाणी पोहोचलेली रेती पंचनामा करून महसूल प्रशासन कार्यवाही करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. महसूल नाके मॅनेज करून वा नाके मार्ग चुकवून रातच्या अंधारात येणारी रेती एकीकडे बांधकाम करणाऱ्यांना सोयीस्कर असली तरी राज्य शासनास मोठ्या प्रमाणात नुकसान करणारी आहे. आजतागत हजारो ब्रास रेती उत्खनन करून विक्री केली गेली आहे. या अवैध व्यवसायातील अपराधी मानसिकता पोषक होत असून सभ्य समाजासाठी घातक आहे. याचा विचार करून प्रशासनाने कठोर पावले उचलावी व दोषींवर शिस्त लावावी.