April 25, 2025

जिल्हा कारागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाने दिला नवचैतन्याचा श्वास;

गडचिरोली २५ मार्च : ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने गडचिरोली जिल्हा कारागृहात आज करण्यात आले. मनोरंजन, प्रबोधन, जनजागृती आणि मार्गदर्शन करणारा हा कार्यक्रम कारागृहातील बंदींसाठी जीवनातील नवचैतन्याचा अनुभव ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. आर. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सुभाष सोनवने होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, पत्रकार मिलींद उमरे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी आनंद कोकाटे, तुरुंग अधिकारी महेशकुमार माळी, आरोग्य अधिकारी डॉ. बोधीरत्न भडके उपस्थित होते.

न्या. आर. आर. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “कला आणि सांस्कृतिक उपक्रमातून माणसात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्यातील कलागुणांना वाव द्या, चिंतनशील राहा आणि आनंद जोपासत विधायक कार्याकडे वळण्याचे त्यांनी आवाहन केले.
कारागृह अधीक्षक सुभाष सोनवने यांनी सांगितले की, “संगीत, कला आणि सृजनशीलता जीवनाच्या अंधारातही आशेचा किरण निर्माण करू शकतात. चुका प्रत्येकाच्या आयुष्यात होतात, पण त्या चुका स्वीकारून नव्याने सुरुवात करता येते.” त्यांनी बंद्यांना या कार्यक्रमाचा मन:पूर्वक आनंद घेण्याचे आवाहन केले.
जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी सकारात्मक परिवर्तनासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले. कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे नव्हे तर परिवर्तनाचे स्थळ आहे. शासन बंद्यांच्या मानवाधिकारांची जपणूक करते व त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देते. कारागृहातील निवांत वेळ आणि शांतता ही आत्मचिंतनासाठी मोठी संधी असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मिलींद उमरे यांनी केले. कार्यक्रमात शास्त्रीय नृत्य, देशभक्तिपर गीतं, चित्रपट गीते यांची रंगतदार सादरीकरणे करण्यात आली. तसेच, योगासने आणि मानसिक आरोग्यावर आधारित सत्रेही घेण्यात आली.

योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे, शास्त्रीय नृत्य प्रशिक्षक स्मिता खोब्रागडे, गायक दीपक मोरे, शिल्पा अलोन व शैलेश देशकर तसेच कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कारागृहातील बंदी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!