पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव रचणारा पती अटकेत; पाच वर्षांपूर्वीच्या प्रेयसीच्या बलात्कार-खुनाचा काळा इतिहास उघड

गडचिरोली, ६ एप्रिल : कोरची तालुक्यातील अंतरगाव येथे एका नवविवाहितेच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नीची हत्या करून अपघाताचा बनाव रचणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली असून, या प्रकरणात त्याचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने आपल्या आधीच्या प्रेयसीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. जामिनावर सुटल्यानंतर त्याने दुसरीशी लग्न केले आणि तिसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध ठेवले, ज्यामुळे हा दुसरा खून घडला.
१ एप्रिल रोजी सकाळी अंतरगाव येथील चमेली प्रदीप हारामी (वय २१) ही आपल्या पती प्रदीप बालसिंग हारामी (वय ३२) सोबत घरी एकटी होती. प्रदीपचे आई–वडील आणि बहीण मोहफूल वेचण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान, चमेलीने पतीच्या मोबाईल मधे त्याच्या प्रेयसीचे फोटो पाहिले आणि याबाबत विचारणा केली. या वरून दोघांमध्ये वाद झाला. प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असल्याचा राग मनात ठेवून प्रदीपने चमेलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने पाण्याचे भांडे घेऊन पडल्या नंतर सोफ्याचा लाकडी कोना लागल्याचा बनाव रचला आणि झोपडीसाठी लाकडे गोळा करण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडला.
प्रदीपची बहीण घरी परतली तेव्हा चमेली मृतावस्थेत आढळली. प्रदीपने तातडीने तिला कोटगुल येथील खासगी दवाखान्यात नेले आणि शवविच्छेदन टाळण्यासाठी अंत्यसंस्काराची घाई केली. मात्र, चमेलीच्या माहेरच्या मंडळींनी उत्तरीय तपासणीची मागणीकेली. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले. अंत्यसंस्कारादरम्यान प्रदीपने नाटकी अश्रू ढाळून दुःखाचा दिखावा केला होता, पण पोलिस तपासात त्याच्याच हाताने खून झाल्याचे स्पष्ट झाले. ५ एप्रिल रोजी पोलिसांनी त्याला अटक केली आणि कुरखेडा न्यायालयात हजर केले, जिथे त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
प्रदीपचा गुन्हेगारी इतिहासही या तपासात समोर आला. २०१८ मध्ये त्याने आपल्या तत्कालीन प्रेयसीला लग्नासाठी तगादा लावल्याने तिच्यावर कुरखेडा तालुक्यातील तळेगाव जंगलात बलात्कार केला आणि ब्लेडने गळा चिरून तिची हत्या केली. या प्रकरणात त्याला अटक झाली होती आणि पाच वर्षे कारागृहात घालवल्या नंतर तो तीन वर्षांपूर्वी जामिनावर सुटला. त्याने हा इतिहास लपवून व वर्ष पूर्वी चमेलीशी लग्न केले. चमेली मूळची मूरपार (ता. दवंडी, जि. बालोद, छत्तीसगड) येथील होती. लग्नानंतर प्रदीपचे एका विवाहित प्रेमसंबंध सुरू झाले, ज्यामुळे त्या महिलेचा पतीशी संबंध तुटला होता. या प्रेम प्रकरणावरूनच चमेलीने जाब विचारलं आणि तिचा जीव गेला.
उपअधीक्षक रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल ठाण्याचे उपनिरीक्षक दयानंद शिंदे, प्रभारी अधिकारी कृष्णा सोळुंखे आणि पोलिस अंमलदार बाबूराव कवडो यांनी तपासाला गती दिली. प्रदीपच्या बनावाची पोलखोल करत त्याला जेरबंद करण्यातआले. पोलिसांनी त्याच्या मोबाइलमधील पुरावे आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे खुनाचा गुन्हा सिद्ध केला.
या घटनेने अंतरगावात संताप आणि भीती पसरली आहे. प्रदीपच्या क्रूर कृत्यांमुळे गावकऱ्यांनी त्याच्यावर कठोर कारवाईची मागणीकेली आहे. पाच वर्षांपूर्वीचा खून, जामिनावर सुटका आणि पुन्हा दुसऱ्या खुनाने त्याच्या विकृत मानसिकतेचे दर्शन घडले आहे. चमेलीच्या कुटुंबीयांनीही न्यायाची मागणी केली आहे.
प्रदीप हारामी याने आपल्या पत्नीचा आणि यापूर्वी प्रेयसीचा खून करून गुन्हेगारीचे भयंकर चक्र रचले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याच्या हाती बेड्या पडल्या असून, न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रकरणाने कौटुंबिक हिंसाचार आणि प्रेम प्रकरणातील क्रुरतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.