नागपूर विभागात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा होणार; पूर्व तयारीचा आढावा, विविध उपक्रमांचे आयोजन

नागपूर, 17 एप्रिल : येत्या 28 एप्रिल रोजी नागपूर विभागात सेवा हक्क कायद्याची दशकपूर्ती आणि पहिला ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने ग्रामीण ते शहरी स्तरावर विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त अभय यावलकर यांनी दिले. आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत या उपक्रमांच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला.
सेवा हक्क कायदा 28 एप्रिल 2015 पासून लागू झाला असून, पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित लोकसेवा प्रदान करण्यासाठी हा कायदा महत्त्वपूर्ण ठरला आहे. यंदा दशकपूर्ती साजरी करताना राज्य शासनाने 28 एप्रिल हा ‘सेवा हक्क दिन’ म्हणून घोषित केला आहे. या निमित्ताने ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आपले सरकार केंद्रांचे उद्घाटन, विशेष ग्रामसभा, कायद्याच्या तरतुदींचे वाचन, सूचना फलक आणि क्यूआर कोड लावणे यासारखे उपक्रम राबविले जाणार आहेत.
जिल्हास्तरावर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समारंभ होणार असून, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना कायद्याची माहिती दिली जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार, ‘सेवा दूत’ योजना, एसएमएसद्वारे जागृती, शाळा-महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आणि लोककलांद्वारे प्रचार यावर भर देण्यात येणार आहे. महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये विशेष सभा, नागरी सुविधा केंद्रांद्वारे माहिती प्रसार आणि प्रभाग कार्यालयांमध्ये सूचना फलक लावण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अपर आयुक्त तेजुसिंह पवार, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांच्यासह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. सेवा हक्क दिन नागरिकांमध्ये जागृती निर्माण करून शासकीय सेवांचे सक्षमीकरण करणारा ठरणार आहे.