गडचिरोलीत महाराष्ट्र दिनानिमित्त १५ दिवसांची कडक जमावबंदी; कायदा-सुव्यवस्थेसाठी प्रशासन सज्ज

गडचिरोली, ३० एप्रिल : येत्या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. या निमित्ताने राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा किंवा इतर सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता, गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कठोर पावले उचलली आहेत. त्यानुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) आणि (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात २६ एप्रिल २०२५ च्या मध्यरात्रीपासून ते १० मे २०२५ च्या रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशानुसार, या १५ दिवसांच्या कालावधीत कोणत्याही प्रकारची शस्त्रास्त्रे, दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रांची उपकरणे यांचा वापर किंवा वाहतूक पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आली आहे. तसेच, सभ्यता आणि नितीमत्तेला बाधा आणणारी भाषणे, गाणी, चित्रफलक किंवा जनमानसात अस्थिरता निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतींवर कडक बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय, उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक काढणे किंवा सभा आयोजित करणे बेकायदेशीर ठरेल. सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यासही पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू असून, प्रशासनाने याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
“या जमावबंदीमुळे महाराष्ट्र दिन आणि त्यानंतरच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता आणि स्थैर्य राखण्याचा प्रशासनाचा मानस आहे. नागरिकांनी या आदेशाचे पालन करून कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना प्रोत्साहन देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.”