May 12, 2025

न्यायाचा जागर: गडचिरोलीत १२२ प्रकरणांना निकाल, ९७ लाखांची वसुली

गडचिरोली, १२ मे :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हा व तालुका न्यायालयांत राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन झाले. १० मे २०२५ रोजी झालेल्या या लोकअदालतीत १० पॅनलद्वारे १०० प्रलंबित आणि २२ दाखलपूर्व अशा एकूण १२२ प्रकरणांमध्ये तडजोड यशस्वी झाली. यातून ९७ लाख ५२ हजार ४९१ रुपयांची वसुली झाली.

लोकअदालतीत फौजदारी तडजोड, धनादेश कायद्यांतर्गत कलम १३८ ची प्रकरणे, कौटुंबिक वाद, मोटार अपघात दावे, कर्जवसुली, वीजबिल थकबाकी, ग्रामपंचायतींची घरपट्टी-पाणीपट्टी, ग्राहक तक्रारी आणि वाहन चालान यासारख्या विविध प्रकरणांचा समावेश होता. किरकोळ गुन्ह्यांपैकी ५४ प्रकरणे गुन्हा कबुलीद्वारे निकाली काढण्यात आली.

विशेष म्हणजे, पॅनल क्रमांक २ मध्ये एका वैवाहिक प्रकरणात पती-पत्नीने आपसी समझोत्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सलोख्याचा आनंद साजरा करत साडी-चोळी आणि शेला देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

या लोकअदालतीचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी आणि सचिव न्या. आर. आर. पाटील यांच्या देखरेखीखाली झाले. पॅनल क्रमांक १ चे कामकाज न्या. पी. आर. सित्रे, पॅनल क्रमांक २ चे न्या. एस. पी. सदाफळे, पॅनल क्रमांक ३ चे न्या. एस. बी. विजयकर आणि किरकोळ गुन्ह्यांची सुनावणी न्या. व्ही. आर. मालोदे यांनी पाहिली. पॅनल सदस्य मनोहर हेपट, देवाजी बावने आणि अर्चना चुधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

गडचिरोली जिल्हा अधिवक्ता संघाचे अध्यक्ष किशोर आखाडे, ज्येष्ठ अधिवक्ते, सर्व अधिवक्ता वर्ग, न्यायालयीन कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाचे अधिकारी-कर्मचारी यांच्या सहकार्याने ही लोकअदालत यशस्वी झाली. हा उपक्रम सामान्य नागरिकांना जलद आणि परवडणारा न्याय मिळवून देण्यासाठी मोलाचा ठरला.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!