March 7, 2026

कुरखेडा येथे त्रिभुवन बाळबुद्धे यांचे उपविभागीय कार्यालयासमोर अमरण उपोषण

कुरखेडा , 3 जुलै : कुरखेडा तालुक्यातील अंगारा येथील रहिवासी श्री. त्रिभुवन तुकाराम बाळबुद्धे यांनी दि. 30 जून 2025 पासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. न्यायालयीन निर्णयाविरुद्ध कार्यवाही, वारसा हक्काचे उल्लंघन आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी दि. 3 जुलै 2025 रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत सांगितले. यासंदर्भात तहसीलदार, कुरखेडा यांनी दि. 23 जून 2025 रोजी पत्र (क्र. तह. स.म.अ./प्रस्तु-1/कावि/2025) जारी करून उपोषण स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत.

बाळबुद्धे यांचे आरोप आणि मागण्या
बाळबुद्धे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या बाजूने न्यायालयाचा निर्णय असताना तलाठी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्रामपंचायत सचिव आणि पोलीस पाटील, अंगारा यांनी संगनमताने चुकीची कार्यवाही केली. मृत्युपत्रातील सर्वे क्र. 5 आणि 6 दडवून ठेवण्यात आले असून, दि. 09/10/2015 रोजी खारीज झालेल्या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले. दि. 24/12/2024 रोजी उपविभागीय कार्यालयात दाखल अपीलवर अद्याप कोणताही निर्णय न झाल्याने त्यांनी उपोषण सुरू केले. त्यांच्या प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
1. दि. 17/11/2015 चे फेरफार रद्द करावे.
2. खोटे अर्ज सादर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी.
3. खरीप हंगाम 2025 साठी तात्काळ नवीन फेरफार घेऊन मालमत्तेचा ताबा द्यावा.
4. पोलीस पाटील यांनी उर्वरित साहित्याची माहिती द्यावी.
5. मृत्युपत्रातील मालमत्तेची हिस्सेवाटणी करावी, जेणेकरून घरकुल बांधकामास सुलभता होईल.
6. फसवणूक आणि मानहानीबद्दल ₹1,00,000/- नुकसान भरपाई द्यावी.
7. वारसा हक्कानुसार फेरफार घेऊन लेखी हमी द्यावी.
8. दि. 24/12/2024 च्या अपीलवर तात्काळ निर्णय घ्यावा.
9. श्री. व्यंकट विठोबा येरणे यांच्याशी झालेल्या जागेच्या व्यवहाराची रक्कम मिळवून द्यावी.
10. तंटामुक्ती समितीने तात्काळ सभा घेऊन हिस्सेवाटणीचा निर्णय द्यावा.
बाळबुद्धे यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, तंटामुक्ती समिती, अंगारा यांनी मासिक सभेत मकान आणि जागेच्या वादावर तोडगा काढला नाही. तसेच, कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला, परंतु खर्चासाठी कोणतीही मदत मिळाली नाही. उपविभागीय कार्यालयानेही त्यांच्या अपीलवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
या उपोषणामुळे कुरखेडा परिसरात प्रशासकीय कारभार आणि न्यायप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी बाळबुद्धे यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.
बाळबुद्धे यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, त्यांच्या मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा उपोषण सुरू राहील. तहसीलदारांनी उपोषण स्थगित करण्याचे निर्देश दिले असले तरी, बाळबुद्धे यांनी अद्याप उपोषण मागे घेतलेले नाही. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तहसीलदारांचे पत्र
तहसीलदार, कुरखेडा यांनी बाळबुद्धे यांच्या दि. 12/06/2025 च्या अर्जाला उत्तर देताना मा. जिल्हा न्यायाधीश, गडचिरोली यांच्या दि. 28/06/2017 च्या आदेशाचा हवाला दिला. आदेशातील अ.क्र. 3 मध्ये, “The suit remanded to the Trial Court for disposal according to law. The trial court shall grant every opportunity to the parties to prove their case, of the so opt, and shall decide the suit fresh in view of the observations made in this judgment,” असे नमूद आहे. तसेच, अ.क्र. 4 मध्ये, “No Order as to cost” असे स्पष्ट केले आहे. यानुसार, तहसीलदारांनी बाळबुद्धे यांना कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करून उपोषण स्थगित करण्याचे निर्देश दिले आहेत. पत्राची प्रत मा. जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांना माहितीसाठी पाठवण्यात आली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!