March 7, 2026

येचली ग्रामपंचायत भरती घोटाळा: पारदर्शकतेचा अभाव, चौकशीची मागणी

आनंद दहागावकर, भामरागड, १४  जुलै  – भामरागड तालुक्यातील येचली ग्रामपंचायत अंतर्गत दिवाबत्ती/पाणीपुरवठा कर्मचारी (वर्ग-४) पदभरती प्रक्रियेत गंभीर अनियमिततांचे आरोप तक्रारकर्त्यांनी पत्रकार परिषदेत (१२ जुलै २०२५) केले आहेत. या प्रकरणात पैशांचा गैरव्यवहार, नातेसंबंधातील व्यक्तींची निवड आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करत दोषींवर कारवाई आणि पुनर्परीक्षेची मागणी करण्यात आली आहे.

३० सप्टेंबर २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर सात उमेदवारांनी अर्ज सादर केले. मात्र, ९ महिन्यांनंतरही प्रक्रिया रखडल्याने ग्रामसेवकांकडून टाळाटाळ झाली. अखेर १९ जून २०२५ रोजी येचली ग्रामपंचायत भवनात लेखी परीक्षा घेण्यात आली. तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, निकाल अर्ध्या तासात जाहीर करून निवडलेल्या उमेदवाराला अनुभवाचे ५ गुण आणि MSCIT प्रमाणपत्र नसतानाही पात्र ठरवण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यालयाला कुलूप लावून ग्रामसेवक आणि विस्तार अधिकारी गायब झाले. तक्रारकर्त्यांनी उत्तरपत्रिका पाहण्याची मागणी केली असता, टाळाटाळ झाल्याचा आरोप आहे. विस्तार अधिकाऱ्याची बदली झाल्याचे सांगण्यात आले, तर ग्रामसेवकांनी प्रतिसाद दिला नाही.

तक्रारकर्त्यांनी पैशांच्या गैरव्यवहाराचा आरोप करत सखोल चौकशी, नियुक्ती रद्द करणे आणि भामरागड पंचायत समितीमार्फत पुनर्परीक्षा घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा, न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत हरीश येजुलवार, किशोर दुर्गे, महेंद्र येजुलवार, मीनाक्षी बडगेल, आदित्य कुंदाराम आणि विशाल झाडे उपस्थित होते.

या प्रकरणाने स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, पारदर्शक आणि निष्पक्ष प्रक्रियेची मागणी जोर धरत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!