September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

जिल्हाधिकारी पंडा यांचा कुरखेडा दौरा: पूल, शेती नुकसान आणि मलेरिया नियंत्रणावर निर्देश

“कुरखेडा येथील सती नदीवरील पूल ४५ दिवसांत पूर्ण करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अल्टिमेटम; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीचे निर्देश”

गडचिरोली, १४ जुलै : कुरखेडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील सती नदीवरील पुलाच्या कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांना ४५ दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. या पुलाची पाहणी करताना त्यांनी हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्याचे तातडीचे निर्देश दिले.

जिल्हाधिकारी श्री. पंडा यांनी कुरखेडा तालुक्याला भेट देऊन शासकीय यंत्रणेचा आढावा घेतला आणि विविध योजनांची पाहणी केली. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत गड्डम, तहसीलदार राजकुमार धनबाते, गटविकास अधिकारी, तसेच कृषी, आरोग्य आणि इतर विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानग्रस्त शेतीच्या पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण करून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत प्रस्ताव सादर करण्याचे त्यांनी निर्देश दिले. तहसीलदार धनबाते यांनी सांगितले की, कुरखेडा तालुक्यात ४०७ शेतकऱ्यांच्या १५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून, पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत आणि लवकरच शासकीय मदतीसाठी प्रस्ताव सादर केले जाणार आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात सुधारणांचे निर्देश
जिल्हाधिकारी यांनी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करून डायलिसिस युनिट त्वरित सुरू करण्याचे निर्देश दिले. हिंद लॅब या कार्यकारी संस्थेकडे युनिट सुरू करण्यास उशीर झाल्याबद्दल तक्रार नोंदविण्याचे सांगितले. तसेच, रुग्णालयातील अपूर्ण विद्युतीकरणाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.

मलेरिया प्रतिबंधासाठी तातडीच्या उपाययोजना
मान्सूनमुळे मलेरियाचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाला प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले. गावपातळीवर आरोग्य पथकांनी घराघरांत भेटी देऊन तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने तपासावेत, संशयित रुग्णांवर त्वरित उपचार करावेत, मलेरिया प्रतिबंधक औषधांची फवारणी, साठवण पाण्यात गप्पी मासे सोडणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले.

यासोबतच, सातबारा जीवंत मोहीम, धरती आबा शिबिरे आणि वृक्षलागवड यासारख्या कार्यक्रमांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीला महसूल, पोलीस, वन, आरोग्य, कृषी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!