September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

कचऱ्याने तुंबलेल्या नाल्या, डासांचा प्रादुर्भाव: मल्लेरा ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे संकट

आनंद दहागावकर, अहेरी/ गडचिरोली, १८  जुलै : मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या मल्लेरा, मोहूर्ली, रेंगेवाही, लोहारा, कोडसापूर, गंगापूर रिट आदी गावांमध्ये अस्वच्छता, सांडपाणी आणि कचऱ्याने तुंबलेल्या नाल्यांमुळे तीव्र दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, हिवतापाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणि जबाबदारी झटकण्याच्या वृत्तीमुळे गावकऱ्यांचे जीव धोक्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग हिवताप नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असताना, मल्लेरा ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्वच्छता मोहिमांना खीळ बसत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार २,५४६ लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत स्वच्छता आणि मूलभूत विकासकामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. सिमेंट रस्ते आणि नाल्यांचे बांधकाम ठेकेदारांशी संगनमत करून केले गेले, परंतु अल्पावधीतच त्यांची दुरवस्था झाली आहे. याशिवाय, लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली ई-कचरा गाडी मल्लेरा गावातील कोंडवाड्याच्या चिखलात धूळ खात पडली आहे. या गाडीचा वापर न होण्याबाबत गावकऱ्यांना कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

ग्रामपंचायत अधिकारी जे. के. कुमरे, जे ७ जुलै २०२१ पासून येथे कार्यरत आहेत, त्यांच्याकडे चुटूगुंटा ग्रामपंचायतीचा अतिरिक्त प्रभार आहे. मात्र, ते आष्टी येथूनच दोन्ही ग्रामपंचायतींचा कारभार चालवत असल्याने गावात उपस्थित राहत नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. मागील तीन वर्षांत निधीच्या गैरव्यवस्थापनाबाबतही संशय व्यक्त होत असून, रंगरंगोटी आणि इतर खरेदीवर मोठा निधी खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, शुद्ध पाणी, नाले साफसफाई, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षण सुविधांकडे प्रशासनाने अक्षरशः दुर्लक्ष केले आहे.

नागरिकांची मागणी
गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत आणि निधीच्या गैरव्यवस्थापनाबाबत चौकशीची मागणी केली आहे. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीने स्वच्छता मोहीम, हिवताप नियंत्रण उपाय आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजाची चौकशी करावी, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. अन्यथा, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची भीती आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!