शंकरपूर पुलावर एसटी-दुचाकी अपघात: कुरखेड्याच्या तरुणाचा मृत्यू
देसाईगंज, 21 जुलै : राष्ट्रीय महामार्गावरील शंकरपूरजवळील गाढवी नदीच्या पुलावर आज सायंकाळी 4 वाजता झालेल्या थरारक अपघाताने परिसर हादरला! देसाईगंजवरून कुरखेडाकडे जाणारी दुचाकी (MH 33 X 7735) आणि कुरखेडाकडून गडचिरोलीकडे निघालेल्या एसटी बस (MH 13 CU 7516) यांच्यात समोरासमोर भीषण धडक झाली. या धक्कादायक अपघातात दुचाकीस्वार महेश मधुकर देशमुख (वय 30, रा. कुरखेडा) हा 20 फूट लांब फेकला गेला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
तातडीने देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलेल्या महेशला डॉक्टरांनी मृत घोषित केले. काही कामानिमित्त देसाईगंजला आलेला हा तरुण या भयंकर अपघाताचा बळी ठरला. वडसा-कुरखेडा रस्त्यावरील खड्डे, झाडेझुडपे आणि धोकादायक वळणांमुळे वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याच कारणांमुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
देसाईगंज पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गेडाम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष आहे. “रस्ते दुरुस्ती आणि झाडेझुडपांची कटाई त्वरित करा, अन्यथा आणखी जीव जाणार!” अशी संतप्त मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.
हा अपघात परिसरात चर्चेचा विषय बनला असून, प्रशासन या दुर्घटनेकडे गांभीर्याने पाहणार का, हा प्रश्न अनुत्तरीत आहे!
