गडचिरोलीत अवैध मुरूम उत्खननाविरोधात 36 दिवसांपासून ठिय्या आंदोलन; उद्या डफरा बजावणार

गडचिरोली, 24 जुलै : वडसा वन विभागातील आरमोरी आणि पोरला वनपरिक्षेत्रात जेपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने वन्यप्राणी क्षेत्रात रात्रीच्या वेळी अवैध मुरूम वाहतूक केल्याप्रकरणी गेल्या 36 दिवसांपासून मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे. उद्या, 25 जुलै रोजी आंदोलक डफरा बजाव आंदोलन करणार असून, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आंदोलकांचा आरोप आहे की, आरमोरी वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी बडोले आणि वनरक्षक पाटील यांनी 33 हायवा आणि तीन पोकलेनवर जप्तीची कारवाई केल्याचे भासवले, परंतु गेल्या तीन महिन्यांत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोरला वनपरिक्षेत्रात टीसीएम आणि तार कंपाऊंड तोडून मुरूम वाहतूक झाल्याचा दावा आहे. उपवनसंरक्षकांना पुरावे देऊनही कंपनी आणि अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हेतुपुरस्सर चुकीचा अहवाल सादर केला गेल्याचा आरोप आहे.

याशिवाय, जीमलगट्टा वनपरिक्षेत्रात बीएसएनएल कंपनीने फायबर केबल टाकण्यासाठी वाइल्डलाइफ क्षेत्रात एचडीडी मशीनऐवजी जेसीबीद्वारे नियमबाह्य उत्खनन केल्याचा दावा आहे. यात उपवनसंरक्षक आणि वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा संगनमत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.

आंदोलकांनी मागणी केली आहे की, आरमोरी आणि पोरला वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक आणि वनरक्षकांना तात्काळ निलंबित करावे. जोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे बेमुदत आंदोलन सुरू राहील, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.

About The Author

Copyright © All rights reserved. | Newsphere by AF themes.
error: Content is protected !!