पूरग्रस्त शेल्टर होममधील मृत्यू: आत्महत्या की छुपा रहस्य?
“पूरग्रस्ताच्या आत्महत्येने हादरला गडचिरोली: आलापल्लीतील शेल्टर होममधील व्यक्तीने संपवले जीवन”
अहेरी (गडचिरोली), २७ जुलै: : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला असताना, आलापल्ली येथील पूरग्रस्त विस्थापित राजू दसरू उसेंडी (वय ३९) याने दारूच्या नशेत आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २६ जुलै २०२५ रोजी उघडकीस आली.
२३ जुलैपासून दक्षिण गडचिरोलीत पावसाने थैमान घातले असून, फुकटनगर वॉर्डात पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे प्रशासनाने १७ कुटुंबांतील ६४ नागरिकांना आलापल्ली येथील पीएम श्री. जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत (शेल्टर होम) स्थलांतरित केले होते. राजू उसेंडी आपली पत्नी ललिता आणि तीन मुलांसह याच शेल्टर होममध्ये राहत होता. प्रशासनाने आवश्यक सुविधा आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती; तसेच वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून मदत पुरवली जात होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जुलैच्या रात्री राजूने दारू पिऊन पत्नीशी वाद घातला. पत्नीने त्याला शेल्टर होममध्ये झोपण्यास सांगितले असतानाही तो घरी गेला आणि मध्यरात्री साडीने गळफास लावून जीवन संपवले. राजू व्यसनी होता, असे पोलिसांनी नमूद केले. सकाळी ही घटना उघडकीस येताच अहेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा तपास अहेरी पोलीस करत आहेत.
ही घटना पूरग्रस्तांच्या मानसिक तणाव आणि व्यसनाधीनतेच्या समस्यांना अधोरेखित करते. अशा परिस्थितीत विस्थापितांना भौतिक मदतीसोबतच मानसिक आधार आणि समुपदेशनाची गरज असल्याचे स्पष्ट होते. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
