March 7, 2026

शासकीय शाळांमध्ये राजकीय आणि धार्मिक प्रचार; आजाद समाज पार्टीची तक्रार

“गडचिरोलीत शासकीय शाळांमध्ये बेकायदेशीर राजकीय प्रचाराचा धक्कादायक प्रकार; आजाद समाज पार्टीची गुन्हा दाखल करण्याची मागणी”

गडचिरोली, ११ ऑगस्ट : शासकीय शाळा या शिक्षण आणि धर्मनिरपेक्षतेचे केंद्र असताना, गडचिरोली जिल्ह्यातील शाळांमध्ये राजकीय नेत्यांकडून थेट प्रचार आणि धार्मिक शिबिरांचे आयोजन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. आजाद समाज पार्टीने याप्रकरणी गडचिरोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक विनोद चव्हाण आणि नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आजाद समाज पार्टीच्या तक्रारीनुसार, ३० जुलै २०२५ रोजी आमदार डॉ. मिलिंद नरोटे (भाजप), काँग्रेस नेते विश्वजित कोवासे, मिलिंद खोब्रागडे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस नेते राहुल डांगे यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय शाळांमध्ये पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेल्या वह्या व शालेय साहित्याचे वाटप केले. याशिवाय, रामपुरी शाळेत विश्व हिंदू परिषदेने विशिष्ट धार्मिक विचारधारा पसरवणारे शिबीर आयोजित केल्याचा आरोप आहे. या कृतींसाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी सांगितले.

आजाद समाज पार्टीने निवेदनात म्हटले आहे की, अशा कृती RTE Act 2009, शालेय व्यवस्थापन नियम १९८४, Representation of the People Act 1951 आणि शालेय विभागाच्या आदेशांचे उल्लंघन करतात. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांवर मतनिर्मितीसाठी अनुचित दबाव निर्माण होतो, जे भारतीय संविधानातील अनुच्छेद १४, २८(१) आणि २१(अ) चा भंग करते. तसेच, मद्रास उच्च न्यायालयासह अनेक न्यायालयांनी शालेय साहित्यात राजकीय प्रचाराला चुकीचे ठरवले आहे.

आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हा प्रभारी विनोद मडावी, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे, मिडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, तालुकाध्यक्ष प्रेम मडावी आणि सहसचिव मोसम मेश्राम यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती प्रशासनाला केली आहे.

हा प्रकार शालेय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या मनावर होणाऱ्या परिणामांमुळे गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. आता प्रशासन आणि पोलिसांकडून यावर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!