March 7, 2026

गडचिरोलीत शाश्वत विकासाला चालना: ६९७ कोटींच्या योजनेसह जनहिताला प्राधान्य

गडचिरोली, १४ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी घेतलेली ठोस पावले कौतुकास्पद आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्यांनी जिल्हा विकास निधीतील प्रत्येक रूपया जनहित, सामूहिक लाभ आणि शाश्वत मालमत्ता निर्मितीसाठी वापरण्याचा संकल्प व्यक्त केला, जो जिल्ह्याच्या प्रगतीसाठी दिशादर्शक आहे.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादर केलेल्या २०२५-२६ च्या ६९७ कोटी रुपये आराखड्यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी ४५६ कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी २०२.३८ कोटी, आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेसाठी २.६८ कोटी आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ३६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षीचा ६४१ कोटींचा निधी १०० टक्के खर्च झाल्याचे समोर आले आहे, जे प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे द्योतक आहे.

ॲड. जयस्वाल यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सल्ल्याने विकासकामे प्रस्तावित करण्याचे निर्देश देत पारदर्शकता आणि सहभागिता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य विभागातील औषध खरेदी तक्रारींची विशेष तपासणी, मत्स्यव्यवसायात मच्छीमारांना थेट लाभ आणि “उमेद” बचत गटांच्या फिरत्या निधी योजनेला राज्यात आदर्श बनवण्याचे त्यांचे प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. वनविभागाच्या परवानगीमुळे रखडलेल्या रस्ते आणि विकासकामांना गती देण्यासाठी त्यांनी घेतलेली भूमिका आणि भ्रष्टाचाराला थारा न देण्याचा इशारा प्रशासनातील पारदर्शकतेची ग्वाही देतो.

खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, सुधाकर अडबाले, डॉ. मिलिंद नरोटे, रामदास मसराम, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विकासाचा रथ वेगाने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त झाला. त्रयस्थ संस्थांमार्फत कामांच्या गुणवत्तेची तपासणी आणि जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीला अनुरूप योजना आखण्याचे ॲड. जयस्वाल यांचे निर्देश गडचिरोलीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरतील.

जिल्ह्याच्या शाश्वत आणि समावेशक विकासासाठी ॲड. जयस्वाल यांचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद असून, गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आशादायी पाऊल आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!